परभणी : (दि.०७) शासनाच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या बालसंगोपन योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी परभणी शहरातील साखला प्लॉट, लोहगाव रोड प्रभाग क्रमांक १६ मध्ये योजनेची जनजागृती करण्यासाठी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रभाग क्रमांक १६ साखला प्लॉट, ज्ञानेश्वर नगर तथा परिसरातील एकल पाल्यांची मुलं आणि संभाव्य लाभार्थ्यांना योजनेचा समावेश करून शासनाच्या योजना मंजुरी करिता विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत.प्रभागातील सामाजिक कार्यकर्ते पवन कटकुरी तथा शेख उस्मान भाई यांच्या पुढाकाराने मेळाव्याचे आयोजन लवकरच करण्यात येणार आहे.
बालसंगोपन योजनेसाठी पात्र लाभार्थी
१. अनाथ किंवा ज्यांच्या पालकांचा पत्ता लागत नाही व जी बालके दत्तक देणे शक्य नाही अशी बालके.
२. एक पालक असलेली बालके, (एका पालकाचा मृत्यू, घटस्फोट, पालक विभक्तीकरण,परित्याग, अविवाहित मातृत्व, गंभीर आजार, पालक रूग्णालयात असणे, इ. कारणांमुळे कुटुंब विघटीत झालेली, एक पालक असलेली बालके).
३. कुटुंबातील तणाव / तंटे / वादविवाद / न्यायालयीन वाद अशा सारख्या कौटुंबिक संकटात बाधित बालके (Family Crisis). ४. कुष्ठरुग्ण पालकांची बालके, जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांची बालके,तुरुंगात असलेल्या पालकांची बालके, एच.आय.व्ही. ग्रस्त पालकांची बालके, कॅन्स सारख्या दुर्धर आजाराने बाधित पालकांची बालके.
५. तीव्र मतीमंद बालके, एच.आय.व्ही. ग्रस्त किंवा कॅन्सरग्रस्त बालके, ४०% पेक्षा अधिक अपंगत्व असलेली, अंध, दिव्यांग बालके, भिक्षा मागणारी बालके, पोक्स अधिनियमांतर्गत बळी पडलेली बालके, तीव्र कुपोषित बालके, सॅमबालके, दुर्धर आजार असलेली बालके, व्यसनाधिन बालके, विविध प्रकारच्या दंगलीनी प्रभावित झालेली बालके, कोविड सारख्या रोगाच्या प्रादुर्भावाने दोन्ही / एक पालक गमावलेली बालके, नैसर्गिक आपत्तीमध्ये दोन्ही /एक पालक गमावलेली बालके, बालविवाहाला बळी पडू शकणारी बालके, विधी संघर्षग्रस्त बालके. ६. दोन्ही पालक दिव्यांग असलेली बालके.
७. रस्त्यावर राहणारी, शाळेत न जाणारी, बालकामगार बालके.
८. कौटुंबिक हिंसाचार प्रकरणात गुंतलेल्या पालकांची बालके. ९. “भिक्षेकरी गृहात” दाखल पालकांची बालके. (याबाबत भिक्षेकरी गृहाच्या अधिक्षक यांचे प्रमाणपत्र आवश्यक राहील.)
बालसंगोपन योजनेच्या लाभार्थी निवडीसाठी आवश्यक असणारी कागदपत्रे व कार्यपद्धती
१. बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ सुधारित अधिनियम २०२१ कलम २ (१४) व महाराष्ट्र राज्याचे बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) नियम, २०१८ नुसार अनाथ, निराश्रित, निराधार, बेघर, संरक्षण व निवा-याची गरज असलेल्या ० ते १८ वयोगटातील बालके या योजनेच्या लाभासाठी पात्र असतील. २. लाभार्थ्याचा रहिवाशी दाखला (तलाठी / ग्रामसेवक / नगरसेवक / सरपंच यांचेकडून निर्गमित दाखला) ३. लाभार्थ्याचे व पालकाचे आधार कार्ड (छायांकींत प्रत) ४. लाभार्थ्याचे / पालकांचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा कमी असल्याबाबतचा तलाठी /तहसीलदार यांचा दाखला
५. दारिद्रय रेषेखालील कुटुबांस प्राधान्य देण्यात यावे.
६. आई/वडिलांचा अथवा दोघांच्या मृत्यू दाखला.
७. पालक/आई/वडील यांचे समवेत घरासमोरचा फोटो.
८. बालकांचा जन्म तारखेचा दाखला / शाळा सोडल्याचा दाखला मिळण्यास विलंब होत असल्यास मागच्या इयत्तेची गुणपत्रक किंवा बोनाफाइड प्रमाणपत्र घेण्यात यावे.
९. बालक व पालक बाल कल्याण समितीसमोर हजर राहणे आवश्यक आहे.
१०.३ ते १८ वयोगटातील लाभार्थी हा शिक्षण घेत असल्यास (शाळेची गुणपत्रिका/बोनाफाईड सोबत जोडावे.)
११. बँक अकाऊंट क्रमांक (पासबुकची छायांकित प्रत)
१२. बालकाचा सांभाळ करत असल्याबाबतचे जैविक पालकांव्यतिरीक्त संगोपन कर्त्याचे किंवा नातेवाईकांचे हमीपत्र
१३. कुमारी मातेचे पाल्य, कौटुंबिक हिंसाग्रस्त महिलेचे पाल्य, आई किंवा वडील सोडून गेलेली बालके, दुर्धर आजाराने ग्रस्त पालकांची बालके, दोन्ही पालक अपंग असलेली बालके यांचे करिता प्रकरणपरत्वे पोलीस अहवाल, वैद्यकीय प्रमाणपत्र व ग्रामसेवक यांचा दाखला,
१४. बालकांचा सांभाळ करणारी व्यक्ती व्यसनाधिन नसल्याबाबतचा बालकाचा सांभाळ करणाऱ्या व्यक्तीचा सामाजिक तपासणी अहवाल.
१५. “भिक्षेकरी गृहात” दाखल पालकांच्या बालकांकरीता (भिक्षेकरी गृहाच्या अधिक्षक यांचे प्रमाणपत्र आवश्यक राहील.)
१६. एका पालकाचा मृत्यू, घटस्फोट, पालक विभक्तीकरण, परित्याग, अविवाहित मातृत्व,
गंभीर आजार या संदर्भातील आवश्यक कागदपत्रे असणे गरजेचे आहे.
१७. सर्वसामान्यपणे एका कुटुंबातील दोन बालकांना योजनेचा लाभ अनुज्ञेय राहील. तसेच एका
कुटुंबात दोनच बालकांना सांभाळ करण्यासाठी ठेवता येईल.
प्रभागात आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्याला उपस्थित राहून योजनेच्या बाबत माहिती घेऊन अधिकाधिक लाभार्थ्यांपर्यंत योजना पोचविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.संपर्क पवन कटकुरी ८३०८१११८८८ आणि शेख उस्मान ९५४५४६६४१५.