आदिवासी विधवा आणि परित्यक्ता खात आहेत भाकरीचे कोरके…
#आदिवासीदिन
विधवा आणि परित्यक्ता यांची स्थिती दयनीय असते.. त्यातही ती महिला आदिवासी असेल तर तिचे जीवन किती विदारक होते हे काल बघितले.. आई विधवा आणि मुलगी परित्यक्ता अशा दोघेही एका खोपटात राहतात.. देवाची वाडी समशेरपूर तालुका अकोले येथे गेल्यावर या दोन महिलांना भेटलो. त्यांना मिळालेले घरकुल नातवाने हडपले.तो दारू पिऊन शिव्या देतो त्यामुळं या काही बोलत नाहीत.. या बिचाऱ्या दोघींनी दगडावर दगड रचून छोटे खोपटे तयार केले.. विधवा आई कामाला जाऊ शकत नाही व परित्यक्ता मुलीला फिट येतात त्यामुळं काम कोणी देत नाही व तिचीही अशक्तपणामुळे काम करण्याची क्षमता दिसली नाही..
दोघी मिळून कसे तरी जगतात.. खायला ही मिळत नाही. त्यांच्या त्या खोपटात जाऊन बघितल्यावर अंगावर अक्षरशः काटा आला. धान्य असेल तर भाकरी करतात व नसेल तर शिळ्या भाकरीचे तुकडे एका टोकरीत करून ठेवलेले व भूक लागली की ते खायचे हे बघितल्यावर अक्षरशः सुन्न व्हायला झाले.. आज आदिवासी दिन या भगिनींना महाराष्ट्र सरकार काय शुभेच्छा देणार आहे..?
कोणतीच कागदपत्रे यांच्याकडे नाहीत त्यामुळे आता कोणतीच योजना यांना मिळणे मुश्कील आहे.. समशेरपुर येथील सामाजिक कार्यकर्ते संदीप दराडे हे धान्य पोहोच करतात पण ते किती दिवस करतील…? अशी शेकडो कुटुंब वाऱ्यावर आहेत. सरकार आणि समाज म्हणून आपण काय करणार आहोत…?
जे एका भेटीत आपल्याला दिसते ते सरकार नावाच्या तिथल्या स्थानिक यंत्रणेला दिसत नसेल का ? विधवांची स्थिती आणि परित्यक्ता यांची स्थिती इतकी भीषण आहे, विदारक आहे.. महिलांसाठी म्हणूनच धोरण जाहीर करावे हे आम्ही मागतो आहोत…या भेटीच्या वेळी सोबत मित्र मनोज गायकवाड,नवनाथ नेहे,संदीप दराडे व भास्कर बेनके होते.
श्रमिक विश्व न्युज