एव्हढ्या आर्थिक विवंचनेतून जाऊन देखील सामान्य नागरिक अर्थव्यवस्थेबद्दल , आर्थिक धोरणांबद्दल काहीही प्रश्न उपस्थित करीत नाहीत.
याची कारणे शोधण्याची गरज आहे.
त्याचे एक महत्वाचे कारण म्हणजे धार्मिक, अध्यात्मिक, सामाजिक, साहित्यिक, राजकीय संस्कारातून माणसांच्या मनावर हे बिंबवले जाते कि,
समाज आणि समाजात चाललेली सर्व कार्ये सुटी सुटी माणसे करत असतात ; ज्याला आपण “ऑटोमाइज्ड सोसायटी” म्हणू शकतो.
त्याला जोड मिळते चांगल्या वाईट नशिबाची ; पूर्वजन्म , पाप पुण्य या कल्पनांची.
त्यामुळे,
आपली आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी प्रत्येकाने भरपूर कष्ट करावेत ; त्याचा रोजगार प्रधान किंवा स्वयंरोजगाराला प्रोत्साहन देणाऱ्या आर्थिक धोरणांशी काही संबंध नाही.
प्रत्येक शाळा / कॉलेजमधील तरुण तरुणींनी अभ्यास करावा , पहिला नंबर काढावा ; त्याचा शासनाच्या शैक्षणिक धोरणांशी काही संबंध नाही,
प्रत्येक शेतकऱ्याने प्रगतिशील शेतकरी व्हावे ; त्याचा शेती क्षेत्रातील शासनाच्या कमी होत जाणाऱ्या भांडवली गुंतवणुकीशी काही संबंध नाही.
प्रत्येकाने चांगला आहार घ्यावा , व्यायाम करावा व आपापले आरोग्य सांभाळावे ; त्याचा सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील शासकीय गुंतवणुकीशी , हवा , पाण्याच्या प्रदूषणाशी काही संबंध नाही.
टू बी शुअर. प्रत्येकाने अभ्यास, कष्ट , व्यायाम , प्रयोगशीलता केलीच पाहिजे ; त्याला त्याचे फळ देखील मिळाले पाहिजे.
पण व्यवस्थांच्या , आर्थिक धोरणांच्या कमतरतेची कसर व्यक्तींनी घेतलेले कष्ट भरून काढू शकत नाहीत ; जे व्यवस्थांच्या वर मात करून दाखवतात ते लाखांमध्ये एक असतात.
त्या अपवादांची उदाहरणे देऊन परत प्रस्थापित व्यवस्था मात न करू शकणाऱ्यांना दोष देते “बघा , त्यांना जमते , तुम्हाला का नाही जमत “ न्यूनगंड तयार करते . त्यातून त्यांच्यावर राज्य करणे सोपे जाते.
प्रौढ स्त्री पुरुषांना एकप्रकारे अमूर्त असणाऱ्या व्यवस्थांचे आकलन करून देणे हे सर्वात मोठे आव्हान आहे.
आणि म्हणून शुद्ध आर्थिक / वित्तीय शिक्षणाला मर्यादा आहेत ; त्याला सामाजिक, राजकीय शिक्षणाची जोड असली पाहिजे
संजीव चांदोरकर.