कडाक्याच्या थंडीत पारधी बांधवाचा उपोषणात मृत्यू
!! मरावे परी चेकरूपी उरावे…!!
बीड तालुक्यात वासनवाडी येथील अप्पाराव पवार यांचा बीड जिल्हाधिकारी कचेरीसमोर उपोषण करताना आज मृत्यू झाला. कडाक्याच्या थंडीत हे उपोषण सुरू होते.गेली काही वर्षे अप्पाराव महसूल आयुक्त कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करत होते.त्यातच त्यांचा बळी गेला.
बीड तालुक्यातील वासनवाडी शिवारात पवार कुटुंब ३५ वर्षांपासून राहत आहे. एकूण ४ कुटुंबे घर बांधत होती.२०२० साली त्यांना घरकुल मंजूर झाले. ग्रामसेवकाने ८ अ उतारा दिला.बांधकामासाठी पहिला हफ्ता देखील मिळाला मात्र बांधकाम साहित्य खरेदी केले व खोदायला सुरुवात केली तेव्हा एका राजकीय व्यक्तीने ही जागा आमची आहे म्हणत बांधकाम थांबवले. ही गावाच्या शिवारातील जागा हाय वे च्या जवळ असणार असल्याने ती जागा देण्यास विरोध केला.तिच्यावर त्या राजकीय व्यक्तीनी ताबा कसा मिळवला ? कधी नावावर झाली हे आता तपासायला हवे.
या कुटुंबाला गेली अनेक वर्षे मदत करणारे तत्वशील कांबळे यांनाही या विषयात लक्ष घालू नका असे निरोप आले. तरीही तत्वशील यांनी त्यांना मदत केली.
मला घरकुल मंजूर केले आहे , ती जागा मिळत नसेल तर दुसरीकडे जागा द्या पण घरकुल बांधून द्या,न्याय द्या म्हणून अप्पाराव सतत आंदोलने करत राहिले. त्यांनी मुंबईत उपोषण केले, औरंगाबाद येथे विभागीय आयुक्त यांच्यासमोर उपोषण केले. पण निर्णय झाला नाही. घर नसल्याने हे कुटुंब औरंगाबाद येथे पुलाखाली कधी राहायचे.फुगे विकून गुजराण करत होते.बीडला जाऊन सतत आंदोलन करत होते.
गावाने यात काहीच मदत केली नाही. जागेचा वाद मिटवला नाही की दुसरी जागा दिली नाही
पारधी समूहासाठी काम करणारे अशोक तांगडे म्हणाले की जिल्हाधिकारी इतर जागा आपण त्यांना खरेदी करून देऊ असे म्हणत पण पारधी घरे बांधणार म्हटल्यावर कोण जमीन देईल ? तत्वशील यांनी जागा बघितल्या पण यश आले नाही. शेवटी वैतागून अप्पाराव यांनी उपोषण सुरू केले.
यापूर्वी झालेल्या उपोषणस्थळीच सुनेची प्रसूती झाली होती. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू असतांना नातवाचा डेंग्युमुळे मृत्यू झाला होता व आज स्वतः अप्पाराव गेले…
सर्वात वेदनादायक हे की केंद्र सरकारने २०२२ पर्यंत सर्वाना घरकुल देऊ अशी घोषणा केली आहे आणि ते २०२२ साल संपत असतानाच आज त्याच घरकुलासाठी मृत्यू झाला आहे. मोठ्या घोषणांची तळातील अंमलबजावणी ही अशी केविलवाणी असते..
यापूर्वी २००५ साली ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बिल्डर कामाचे पैसे देत नाही म्हणून उपोषणाला बसलेल्या चिनगुंडे नावाच्या व्यक्तीचा उपोषणात मृत्यू झाला होता. पोलिसांनी लगेच त्या बिल्डरला अटक केली व पैसे द्यायला लावले…इथेही आता सरकार धावपळ करून बिचाऱ्या पारधी कुटुंबाला जागा मिळवून देईल व घरकुलाचा पुढचा हप्ता देईल..तो फोटो सगळ्या पेपरला येईल….मरावे परी चेकरूपी उरावे इतकाच गरीबांच्या मरणाचा अर्थ असतो का…?
लोकशाहीतील सर्व आयुधे किती बोथट झाली आहेत याचे हे उदाहरण ठरावे. गंगा शुद्धीकरणासाठी उपोषणात एका शास्त्रज्ञाचा झालेला मृत्यू आणि आजचा हा मृत्यू बघता उपोषण सारखे शस्त्र आता कोण कशाला वापरील…? ब्रिटिश उपोषणाने हादरत होते आपली यंत्रणा त्यांच्याही पलीकडे गेली आहे का ?
बिचारे पारधी एकतर गुन्हेगारीचा शिक्का बसून तुरुंगात जातात म्हणून बाकीचे घाबरून जंगलात लपून राहतात…अप्पाराव ने हक्काचे घर बांधण्याचे स्वप्न बघितले तर त्याला आकाशाच्या छपराखाली मरावे लागले पण डोक्यावर छप्पर मिळाले नाही……
हेरंब कुलकर्णी
श्रमिक विश्व न्युज