बहरहाल :
आंदोलने विशेषतः आपला पक्ष विरोधी पक्षात असल्यास असतात,मुद्दे येत राहतात-जात राहतात पण राष्ट्रीय पातळीवर वेळोवेळी येणाऱ्या आदेशाचा अनुषंगाने कार्यकर्त्यां मध्ये स्पिरिट निर्माण करण्यासाठी आणि जनतेत आपली छवी राहावी म्हणून मध्ये मध्ये काही बाही चालत राहते.घरावर तुळशीपत्र ठेऊन काम करणारे कार्यकर्ते हि असतात,निष्ठा वैगेरे अशी काही बाही बाब असते तसेच धूर्त परिस्थितीजन्य कार्यकर्ते पण असतात.कंत्राटदार कम कार्यकर्ते पण हल्ली बघायला भेटतात.निष्ठा वैगरे वगैरे असणारे कार्यकर्ते हे साहेबांचे निस्सीम भक्त असतात.पूर्वी कधी काळी विचार-तत्व अश्या काही भाकड गुणदोषांनी ओतप्रोत कार्यकर्ते होते असे काही जुने लोक्स सांगत असतात पण जागतिकीकरणाने जसे सर्वच क्षेत्रे गिळंकृत केली तस या भागात देखील शिरकाव केला आणि विचार-तत्व कशाशी खातात याची माहिती नसणारे कार्यकर्ते घडवण्याची तजवीज केली गेली.सगळं ठरवून घडलं अस एकाएकी नाही झालं काही …
तर कार्यकर्ते एका उमेदीचा काळात नेत्यावर फिदा असतात,नेताही वेळ आणि उमेद जागृत असणाऱ्यांची काळजी घेत असतात.अत्ता एक मोठा पेच निर्माण झाला आहे फक्त निवडणूका मध्ये मला जिंकायचे आहे म्हणून प्रतिस्पर्धी माझा तेवढ्या पुरता विरोधक होत असतो.इतर काळी त्यांचा सर्व सत्ता समीकरणात-निर्णय-धोरणात काही विरोध करण्याचे कारण राहिले नाहीये.कारण म्हणजे काही नव्हतेच पण जेंव्हा निवडणूका येत तेंव्हा प्रतिस्पर्ध्यांची स्तुती करून कसे जमेल-बिमेल म्हणून विरोध करणे गरजेचे होत गेले आहे.प्रस्तापित पक्षांचे सत्तेत असल्यावर अगर सत्तेत नसल्यावर वैचारिक चारित्र्य वैगरे वैगेरे काही तसूभरही बदलत नसते.तसे काहींना वाटते पण वाटणे आणि प्रत्येक्षत अंतर असते.त्यामुळे एका बाबतीत काही सवड भेटत आहे,काल एका नेत्याचा सोबती असलेला कार्यकर्ता आज दुसऱ्याच कोणत्यातरी नेत्यांचा संगतीने सक्रिय झाला तरी अधिक आश्चर्य वाटेनासे झाले आहे.खूप दुनिया बदली,बदल हा स्रष्टीचा नियम आहे वगैरे वैगेरे …
खाली आमचे साहेब,ज्यांचा विरोधात लढले त्यांचा पक्षांसोबत वर युती-आघाडी झाली असल्यावर काही करणे-बिरणे निर्थक ठरत गेले.पण ते जाऊ द्या …कार्यकर्ता बिचारा साहेबांचा एका खांद्यावरील ठेवलेल्या हातानं येवढा भाळला कि इमोशनल ब्लॅकमेल ची फिलिंग कित्येक दिवस चालत राहिली.काय धोरण आहेत,काय निर्णय आहेत,काय जनहित आहे याची काय ची काय देणे घेणे नसलेली फौज तयार झाली.त्यात वर उल्लेखलेली भाबडी-धूर्त-आणि कंत्राटदार अशी वर्गवारी तयार झाली.साहेबांना सर्वच जन हवे आहेत.पण एकमेकांना एकमेकांनाचा उद्योग कळला नाही पाहिजे.
निष्ठा असलेला,कालांतराने उमेद हरवून बसलेला कार्यकर्ता पुढे साहेबांचा धोरणांची कृपा म्हणून नौकरी-उद्योग करण्याचा लायकीचा राहिला नाही,पण काही नाही करून हि जमणार नाही अश्या कोंडीत अडकलेला कफल्लक कार्यकर्ता झाला आणि प्रवाहाचा रेट्यात किनारी हि लागला.प्रवाह चालू आहे,साहेबांची टर्म नवीन उमेद घेऊन अनेक नवे चेहरे जोडले गेले आहेत.आधीचे काय झाले कोण विचारत नाहीये …वैगेरे वैगेरे चालत राहणारी कथा आहे.
धूर्त असणारे कार्यकर्ते,सर्व पक्षीय समभाव घेऊन झेंडा खांद्यावर घेऊन तत्पर आहेत,धूर्त नेत्यांचे हे गुण आत्मसात केलेली ही एक कार्यकर्त्यांची जमात आहे.आपल्या साहेबांना कोणाचा परेज नाहीये तर आपण कुठं निष्ठा-वैगेरे वैगेरेचा भानगडीत पडायचे असा हा सुद्ध प्रॅक्टिकल व्यवहार आहे.बाकी काही काळ इकडे काही काळ तिकडे परमार्थ चालवला जात असतो.अश्या कार्यकर्त्यांचा बाबत साहेबांना सुद्धा थोडा अधिक लळा असतो,काय माहिती पण शुद्ध प्रॅक्टिकल व्यवहार असल्याने काही अनबन होणार नाही याची शास्वती असते.
अनेक वर्षे साहेबांची निष्ठतेने कार्य करत आलेला एक कार्यकर्ता परवा सांगत होता की साहेबांचे तोंड देखील बघण्याची इच्छा राहिली नाहीये,आता एखादे काम असेल तर थेट प्रशासकीय अधिकाऱ्यांना भेटणे श्रेयकर कारण काय ? बाय-पास जाण्याने वेळ आणि संपत्ती दोन्हीचा काही प्रमाणात र्ह्यास टळतो. कधी काळी मजबूत किल्ला लढवलेले कार्यकर्ते घरची परिस्थिती ठीक असल्याने काही प्रमाणात तरले आहेत.बाकी काही काही तर काही करण्याचा लायकीचे सोडले नाही या व्यवस्थेने.
आपली लोकशाही मोठी गमतीशीर आहे,प्रस्तापित पक्षांची जवळपास सारखीच धोरणे आहेत.थोडी कमी अधिक गतीने राबवणे कालांतराने होत असेल एवढाच काय तो फरक. पण त्यातही सगळे स्वतःला अनेक वर्षे एकमेकांना विरोधक म्हणून समाजमनावर बिंबवण्यात अनेक दशके यशस्वी ठरले आहे.पण गोची होण्याचा हा काळ आहे,सत्तेचा समीकरणाने त्यात अनेकांना उघडे पाडले आहे.शोकांतिका आहे पण याचे जनता काही गांभीर्याने घेत नाही.मग त्यांचा हि विकास अजेंडा,यांचा हि विकास अजेंडा प्रचाराचा धुराळा उडतो.ऐनवेळी निवडणूकांचा आधी कोणी कोलांटउड्या मारतो कोणी निवडून आल्यावर परिस्थितीजन्य बाजू घेतो आणि बाकी चालले आहे वैगेरे वैगेरे …
काही असो सगळं डोळ्या समोर घटते आहे पण मती गुंग झाली आहे,कोणाला कोणता विकास भावतो आणि पर्यायाने गत परिस्थितीचा विरोधात मत बनवलेली जनता पर्याय नसल्याने पुन्हा आधीची स्थिती समोर पाहून काही बाही निर्णय घेऊन पुन्हा पाच वर्षे नामानिराळे होते,एका जुन्याच रंगमंचावर नव्या अंकाला पाहून बोटे मोडण्या साठी !
सचिन देशपांडे