परभणी – परभणी तालुक्यातील दुधना नदीवरील हिंगला गावाजवळील पुलाचे काम मागील एक वर्षापासून बंद असून हा पुल अर्धवट बांधलेला असल्याने मागील वर्षभरापासून तसाच बंद अवस्थेत आहे. परभणी ते हिंगला व पुढे वाडी दमई, साडेगाव, मिर्झापूर, पिंपळा, जोड परळी, पिंगळी कोथळा व बोबडे टाकळी या गावाला जोडणारा तसेच परभणी ते झरी मार्गाला कमी अंतर असलेला हा एक पर्यायी रस्ता आहे.
दुधना नदीवरील हिंगला गावाजवळील पुलाचे काम पूर्ण न झाल्याने वरील गावच्या नागरीकांना परभणीला येण्यासाठी २०-२५ कि.मी. चे अतिरिक्त अंतर पार करावे लागते अन्यथा नाईलाजास्तव व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गलथान कारभारामुळे जीव धोक्यात घालून नदी पत्रातून प्रवास करावा लागतो. पावसाळयात नदी पात्रात पाणी असल्याने या मार्गावरील वाहतुक चार – पाच महिने बंदच असते. बाकी ऋतूत या परिसरातील गावकऱ्यांना नदी पत्रातून जीवघेणा प्रवास केल्या शिवाय कुठलाच पर्याय शिल्लक राहत नाही या बाबत परिसरातील गावातील ग्रामस्थांनी या पुलाचे काम तत्काळ मार्गी लावावे या साठी प्रहार जनशक्ती पक्षाकडे लेखी तक्रार केली होती त्या नुसार आज प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांनी पक्षाच्या पदाधिकारी व परिसरातील ग्रामस्थ यांच्या शिष्ट मंडळासह कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, परभणी यांना निवेदन देऊन तत्काळ या पुलाचे काम सुरू करा या मागणीचे निवेदन दिले.
या पुलाच्या रखडलेल्या कामाला गती देण्या बाबत संबंधीत गावकर्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तसेच लोकप्रतिनिधीकडे अनेकदा तक्रारी करुनही सार्वजनिक बांधकाम विभाग कुंभकर्णाच्या झोपेतून उठायला तयार नाही. प्रहार जनशक्ती पक्षाच्या व हिंगला, वाडी दमई, साडेगाव, मिझांपूर, पिंपळा व बोबडे टाकळी या गावातील गावकर्यांच्या वतीने रखडल्या या पुलाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ सुरु करावे अन्यथा येत्या गुरुवार दि. ०३ मार्च २०२२ रोजी सकाळी ८.०० वाजता हिंगला पुलावर प्रहार जनशक्ती पक्ष व वरील गावातील गावकर्यांच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाला रखडलेली विकास कामे सुरु करण्याची सुबुध्दी मिळावी व सार्वजनिक बांधकाम विभागाला कुंभकर्णाच्या झोपेतून जागे करण्यासाठी जनआंदोलन उभे केले जाणार असून या आंदोलनामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी आपल्या कार्यालयावर राहील याची कृपया नोंद घ्यावी असे ही या निवेदनात म्हंटले आहे.
निवेदनावर प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने, युवा आघाडी जिल्हा प्रमुख गजानन चोपडे, हिंगला चे सरपंच ज्ञानेश्वर अब्दागीरे, झरी सर्कल प्रमुख श्याम भोंग, रमेशराव तरवटे, दिव्यांग आघाडी तालुका प्रमुख ज्ञानेश्वर पंढरकर, वैभव संघई, विष्णू गोल्डे, बालासाहेब गोल्डे, भागवत मगर, राहुल झोडपे, मुंजा मगर, सय्यद मुस्तफा, सय्यद अजहर, मिडिया प्रभारी नकुल होगे इत्यादी उपस्थित होते.
श्रमिक विश्व न्यूज