नांदेड :डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गतवर्षी 30 सप्टेंबर ते 01 ऑक्टोबर 2023 च्या मध्यरात्रीपर्यंत 24 तासाचा कालावधीत 24 मृत्यू झाले होते.या रुग्णालयात दररोज होणाऱ्या सरासरी मृत्यूचे हे प्रमाण दुप्पट होते.
जन आरोग्य अभियान महाराष्ट्र टीमच्या वतीने या घटनेच्या नंतर 06 व 07 ऑक्टोबर 2023 या दोन दिवसात डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला भेट देऊन घटनेचे तथ्य शोध घेतला आणि अहवाल प्रकाशित केला.
काय होते या अहवालात ठळक मुद्दे
डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (जीएमसी),नांदेड ची स्थापना 1988 मध्ये झाली. घटनेच्या वेळी या वैद्यकीय महाविद्यालयात पदवीपूर्व वैद्यकीय (एमबीबीएस) जागा 150 तर पदव्युत्तर (पीजी) जागा 83 असल्याचे समोर आले.वैद्यकीय महाविद्यालयात एनएमसीच्या ( नॅशनल मेडिकल कौन्सिल) नियमांनुसार एक मोठे मल्टी स्पेशालिटी रुग्णालय आहे.या रूग्णालयाची सध्याची अधिकृत खाटांची क्षमता ( बेड कप्यासीटी) ५०८ आहे, पण कार्यरत खाटांची संख्या १०८० आहे, तर अनेकदा प्रत्यक्ष प्रवेश ( अडमिशन्स) यापेक्षा जास्त असल्याचे नोंदवले गेले आहे.
30 सप्टेंबर मध्यरात्री ते 1 ऑक्टोबर 2023 च्या मध्यरात्री पर्यंतच्या 24 तासांच्या कालावधीत,नांदेडच्या डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ( GMC रुग्णालयात) 24 मृत्यू झाले.या रुग्णालयात दररोज होणाऱ्या सरासरी मृत्यूंच्या हे प्रमाण दुप्पट होते.दररोजचे प्रमाण 9-12 मृत्यू .या 24 मृत्यूंपैकी 11 नवजात शिशूंचे (1-4 दिवसांचे बाळ), श्वसन त्रास,अपुरे दिवस भरलेले ( नऊ महिन्यापेक्षा कमी दिवस भरलेले) बर्थ एस्फिक्सिया,सेप्टिसीमिया,मेकोनियम एस्पिरेशनचे निदान झालेले होते.नऊ मृत्यू 65 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या वृद्ध व्यक्तींचे होते,यांच्या मृत्यूची विविध कारणे होती.
त्या दिवशी झालेल्या 24 मृत्यू पैकी 17 मृत्यू अशा रुग्णांचे होते ज्यांना इतर रुग्णालयातून रेफर करण्यात आले होते.
प्रसारमाध्यमांमध्ये ही परिस्थिती मोठ्या प्रमाणावर नोंदवली गेली आणि संपूर्ण महाराष्ट्रात चिंतेचे कारण बनली.जन आरोग्य अभियानाच्या वतीने चार सदस्यीय तथ्य शोध समिती स्थापन करून 6 व 7 ऑक्टोबर 2023 दरम्यान नांदेडला भेट दिली. टीमला मिळालेल्या माहितीची ही पार्श्वभूमी होती,ज्याचा संक्षिप्त अहवाल निष्कर्षासह प्रकाशित केला गेला.
माहिती मिळवण्यासाठी टीमने भेटी दिलेली ठिकाणे आणि व्यक्ती
डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (जीएमसी), नांदेड येथे तथ्य शोध समितीने रुग्णाचे नातेवाईक, परिचारिका युनियनचे प्रतिनिधी,कर्मचारी परिचारिका, निवासी डॉक्टर,वैद्यकीय महाविद्यालयातील अध्यापक आणि डीन यांची भेट घेतली. जिल्हा रुग्णालय (सिव्हिल हॉस्पिटल),नांदेड जिल्हा शल्यचिकित्सक (सिव्हिल सर्जन),अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक आणि प्रशासकिय जबाबदारी असलेले वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून माहिती घेण्यात आली. महिला रुग्णालय,नांदेड समितीने अधीक्षक,वरिष्ठ सल्लागार,तज्ञ डॉक्टर,निवासी डॉक्टर आणि परिचारिका यांची भेट घेतली. सीएचसी,नांदेड वाघाळा महानगरपालिका येथे अधीक्षक,तज्ञ डॉक्टर, निवासी डॉक्टर आणि परिचारिका यांच्याशी चर्चा केली. या सार्वजनिक आरोग्य सुविधांना भेट देण्याबरोबरच,नांदेड जिल्ह्यात कार्यरत असलेल्या काही खासगी वैद्यकीय सेवा देणारे ज्येष्ठ वैद्यकीय व्यावसायिक,सिनिअर प्रायव्हेट डॉक्टर्स आणि सामाजिक कार्यकर्त्यां कडूनही प्रतिक्रिया व अभिप्राय घेण्यात आला.भेटी दरम्यान समिती सोबत संपर्क आलेल्या सर्व घटकांकडून एकंदरीत चांगला प्रतिसाद मिळाला आणि जिथे जिथे भेट दिली तिथे सामान्यत: मूलभूत माहिती दिली गेली.
तथ्य शोध समितीचे प्रमुख निष्कर्ष
समितीकडे उपलब्ध असलेल्या वेळेत,विविध व्यक्तीं आणि सुविधा यांना दिलेल्या भेटीद्वारे महत्त्वपूर्ण माहिती प्राप्त झाली. सार्वजनिक आरोग्य सुविधांच्या विविध स्तरांबाबत काही मुख्य निष्कर्ष प्रकाशित करण्यात आले ते पुढील प्रमाणे : डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (जीएमसी) टीमने प्रामुख्याने वाढलेल्या नवजात शिशु मृत्यू संख्येचा संदर्भ लक्षात घेऊन नवजात शिशु अतिदक्षता विभाग (NICU),बालरोग अतिदक्षता विभाग (PICU) आणि स्त्रीरोग,प्रसूती वॉर्डांना भेटी दिल्या.
नवजात शिशु अति दक्षता विभाग NICU
नांदेडच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयच्या नवजात शिशु अति दक्षता विभागात (NICU) उपलब्ध बेड,पाळणे यांची संख्या 20 असल्याची नोंद दर्शवली गेली होती.तर अधिकृत वेबसाईटवर बेड व पाळणे संख्या 40 क्षमता असल्याचा उल्लेख आहे.परंतु समिती समोर माहिती देण्यात आली की NICU मध्ये प्रत्यक्ष 60 ते 70 नवजात शिशूंच्या प्रवेश होतात. प्रत्यक्षात एकाच पाळण्यात दोन ते तीन बाळांवर उपचार केले जात होते,आणि ही परिस्थिती, नेहमीची असल्याचे सांगण्यात आले. नवजात शिशु अतिदक्षता विभाग (NICU) मध्ये प्रत्येक शिफ्टमध्ये 3 परिचारिका असल्याचे निदर्शनास आले. इंडिअन पब्लिक हेल्थ स्टँडर्ड (IPHS ) आणि नॅशनल अॅक्रीडेशन बोर्ड फॉर हॉस्पिटल्स (NABH) च्या निकषांनुसार नवजात शिशु अतिदक्षता विभागात प्रत्येक शिफ्ट मध्ये परिचारिका रुग्ण प्रमाण १:२ असावे. म्हणजेच NICU मधील २० शिशु रुग्णांमागे प्रत्येक शिफ्ट मध्ये किमान १० परिचारिका असणे आवश्यक आहे.
त्यामुळे एनआयसीयूमध्ये सध्या असणाऱ्या नर्सेस,परिचारिकांच्या संख्येच्या तुलनेत किमान तीन पट जास्त परिचारिकांची आवश्यकता अधिरेखित होते.जर आपण एनआयसीयूमध्ये प्रत्यक्ष प्रवेशाच्या मोठ्या संख्येचा (कदाचित 60 पेक्षा जास्त) विचार केला तर त्याहूनही मोठ्या संख्येने परिचारिकांची आवश्यकता असेल. NICU मधील परिचारिकांवर कामाचा जास्त भार आहे.त्यामुळे पुरेश्या वाढीव कर्मचाऱ्यांची तात्काळ आवश्यकता आहे यात शंका नाही.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या हॉस्पिटल मध्ये बालरोग विभागामध्ये एकूण 5 ज्युनिअर रेसिडेंटस कार्यरत होते.ज्यापैकी एक किंवा दोन ज्युनिअर रेसिडेंटस सर्व शिफ्ट्स कव्हर करण्यासाठी NICU मध्ये पोस्ट केले जातात.ज्युनिअर रेसिडेंटस वैद्यकीय अधिकार्यांची भूमिका प्रभावीपणे पार पाडत आहेत, त्यांना अनेकदा जवळजवळ 24×7 काम करावे लागते ज्यामुळे रुग्णांची काळजी तसेच त्यांच्या MD बालरोगशास्त्र अभ्यासक्रमादरम्यान अपेक्षित असलेले आवश्यक तज्ञ प्रशिक्षण (स्पेशालीस्ट ट्रेनिंग) घेण्याची त्यांची क्षमता या दोन्हींवर परिणाम होऊ शकतो.
नवजात शिशु अति दक्षता विभागात (NICU) च्या सर्व शिफ्टमध्ये मिळून केवळ पाचच चतुर्थ श्रेणी कर्मचारी उपलब्ध असल्याचे समोर आले,जे रुग्णांना दुसरीकडे हलवताना (शिफ्ट करताना )मदत करणे,स्वच्छता करणे इत्यादी विविध प्रकारच्या सहाय्यक कामाकरिता आवशक असतात. IPHS च्या नियमांनुसार प्रत्येक शिफ्ट मध्ये किमान तीन या प्रमाणे 9 स्वच्छता कर्मचारी आवश्यक आहेत. एनआयसीयूमध्ये 12 व्हेंटिलेटर, हॉस्पिटल मध्ये दाखल केल्या जाणाऱ्या गंभीर नवजात शिशूंना कधीही कृत्रिम ऑक्सिजनची आवशकता लागू शकते आशा वेळी हे व्हेंटिलेटर्स अपुरे पडू शकतात.रुग्णालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अलिकडच्या काही महिन्यांत औषधांचा अपुरा,अनियमित पुरवठा आणि जास्त रुग्ण संखेमुळे (रुग्णांच्या जास्त भारामुळे) उच्च प्रतिजैविक ( हायर अँटीबायोटिक्स) सारख्या आवश्यक औषधांचा तुटवडा निर्माण झाला. विशेषत: घटनेच्या पूर्वी चार महिन्यांपासून हाफकिन इन्स्टिट्यूटमधील औषधांचा पुरवठा अनियमित आणि कमी पुरवठा होत होता.नवीन वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरण ( मेडीकल गुड्स प्रोक्युअरमेंट अथोरीटी) अद्याप कार्यान्वित होणे बाकी होते.दरम्यानच्या काळात रुग्ण सेवेसाठी आवश्यक औषधांच्या उपलब्धतेमध्ये मोठी तफावत समोर आली.वैद्यकीय कर्मचारी उपलब्ध औषधांच्या सहाय्याने रूग्णांचे व्यवस्थापन करण्याचा प्रयत्न करत असले तरी समाधानकारक परिस्थिती नव्हती.
बाल अतिदक्षता विभाग (PICU) वेबसाइटनुसार PICU मध्ये 20 खाटा,तर प्रत्यक्ष प्रवेश क्षमता 35 असल्याचे नोंदवले गेले होते,घटनेच्या आधीच्या महिन्यात एकूण 613 प्रवेश नोंदवले गेले. तीन शिफ्टसाठी 9 परिचारिका किंवा प्रत्येक शिफ्टसाठी तीन परिचारिका ही संख्या अपुरी होती, IPHS नियमांनुसार प्रति शिफ्ट आवश्यक परिचारिकांची किमान संख्या 10 एवढी आहे. या हॉस्पिटल मध्ये 30 बेड क्षमतेचे दोन वॉर्ड आहेत मात्र वर नमूद केल्याप्रमाणे NICU, PICU आणि बालरोग वॉर्डांसाठी ज्युनिअर रेसिडेंटसची संख्या सर्व मिळून फक्त 5 आहे.याचा अर्थ असा आहे की रेसिडेंटसना दाखल झालेल्या किमान 120 बालकांना रुग्णसेवा पुरविण्याकरिता जास्तीचा ताण दिला जातो.प्रत्यक्षात हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या मुलांची संख्या 200 इतकी आहे. बाल अतिदक्षता विभागात/ PICU साठी केवळ तीनच चतुर्थ श्रेणी स्वच्छता कर्मचारी उपलब्ध आहेत, प्रत्येक शिफ्टमध्ये फक्त एकच कर्मचारी आहे जो स्पष्ट आहे की, पुरेसा नाही.
एकेका बेडवर एकापेक्षा जास्त मुलांना ठेवावे लागते.तथापि, समतीने भेट दिली त्या वेळी,अनेक PICU बेड रिकाम्या होत्या नुकतीच या हॉस्पिटलमध्ये जास्त बालमृत्यू झाल्याची बातमी पसरली होती आणि त्यामुळे बाल रुग्णाच्या प्रवेशावर परिणाम झाला होता.
रूग्ण सेवेशी संबंधित कामाचा अतिरिक्त भार वैद्यकीय महाविद्यालय म्हणून,नांदेडच्या शासकिय वैद्यकिय महाविद्यालयाची प्राथमिक आणि मुख्य भूमिका वैद्यकीय शिक्षण देणे ही आहे, तर रुग्णालय चालवणे ही त्या भूमिकेशी संबंधित भूमिका आहे.काही प्राध्यापकांनी चिंता व्यक्त केली की नांदेड जिल्ह्यातील तसेच जवळच्या जिल्ह्यांमध्ये सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेतील द्वितीय पातळी आरोग्य सेवा यंत्रणा ( उप जिल्हा रुग्णालय )आणि तृतीय पातळी आरोग्य सेवा यंत्रणा ( जिल्हा रुग्णालय ) यांच्या तरतुदीमध्ये मोठ्या प्रमाणात तफावत असल्याने, दुय्यम आणि तृतीय पातळी आरोग्य सेवेकडून रुग्णांचा वैद्यकिय महाविद्यालयाकडे ओघ प्रमाणापेक्षा जास्त आहे,त्यामुळे या रुग्णालयावर रुग्णांचा भार अधिक आहे.नॅशनल मेडिकल कौन्सिल ( NMC) च्या नियमानुसार हे वैद्यकीय महाविद्यालयाचे रुग्णालयात पुरेश्या कर्मचाऱ्यांसहित फक्त ५०० खाटा करीता असणे अपेक्षित आहे परंतु येथे १०८० पेक्षा जास्त इंडोअर रुग्णांवर उपचार के जात आहे,हे वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयाची क्षमता ओलांडते.त्याच वेळी निवासी डॉक्टर्स ( रेसीडेंटस ) हे क्लिनिकल विभागांमध्ये आरोग्य सेवा देण्यात व्यस्त असतात. त्याचा परिणाम त्यांच्या मूळ कार्यावर, म्हणजे वैद्यकीय प्रशिक्षण यावर होतो. अंडरग्रॅज्युएट (एमबीबीएस) विद्यार्थ्यांची संख्या 100 वरून 150 पर्यंत वाढवण्यात आली आहे,परंतु प्राध्यापकांच्या संख्येत मात्र त्या प्रमाणात वाढ झालेली नाही.
महाराष्ट्राच्या इतर भागांमध्ये नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालये सुरू होत आहेत,त्यात वैद्यकीय महाविध्यालायातील काही विद्यमान प्राध्यापकांना प्रतिनियुक्तीवर नवीन महाविद्यालयांमध्ये हलविण्यात आले आहे,त्यामुळे नांदेड मधील शासकीय महाविध्यालयात प्राध्यापकांची संख्या आणखी कमी झाली आहे.
शासकिय वैद्यकिय महाविद्यालय (GMC) नांदेड मध्ये NMC च्या निकषांनुसार विविध स्तरांवर कर्मचारी वाढवण्याची गरज असल्याचे दिसून येते.आणखी एक पैलू (ज्याचा उल्लेख इतर सुविधांमध्ये काम करणार्या काही डॉक्टरांनी केला आहे) GMC मधील अनेक स्पेशालीस्ट डॉक्टर्सचा खाजगी प्रॅक्टिसमध्ये सहभाग आहे.मिळालेल्या माहितीनुसार,शहरातील खासगी रुग्णालयांमध्येही मोठ्या प्रमाणात जीएमसीचे वरिष्ठ तज्ज्ञ डॉक्टर कार्यरत असणे.त्यामुळे सदर तज्ञ डॉक्टर्सचे सरकारी रुग्णालयातील रूग्णांकडे लक्ष कमी होते. (असे डॉक्टर त्यांच्या अपेक्षित कामाच्या तासांपैकी कमी वेळ हॉस्पिटल मध्ये देतात), तर GMC मधील स्पेशालीस्ट डॉक्टर्स त्यांच्या कामाचा मोठा भाग शिकण्याच्या टप्प्यात असलेल्या रेसिडेंटसवर सोडतात.याची आणखी पुष्टी करणे आवश्यक आहे, तथापि, अशा खाजगी प्रॅक्टिसच्या मुळे हे आधीच जास्त भार असलेल्या GMC रुग्णालयातील स्पेशालीस्ट केअरच्या गुणवत्तेशी तडजोड करणारे ठरते.नांदेड GMC मध्ये रुग्ण सेवेचा लक्षणीय ओव्हरलोड सहन करावा लागत असल्याचे वास्तव आहे.जिल्ह्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेच्या इतर स्तरांवर विशेष सार्वजनिक आरोग्य सेवेत एकूण कमकुवत उपलब्धतेचा हा परिणाम आहे.
नांदेड GMC मधील मृत्यूंच्या वाढलेल्या प्रमाणामुळे समोर आलेली संकटासारखी परिस्थिती समजून घेण्यासाठी,नांदेड जिल्ह्यातील आणि आजूबाजूच्या परिसरातील सार्वजनिक व्यवस्थेतील अपुऱ्या तज्ञ आरोग्य सेवांचा (स्पेशालीस्ट हेल्थ केअर सर्व्हिस) संदर्भ समजून घेणे आवश्यक आहे.नांदेडच्या आजूबाजूला १०० किमीच्या परिघात दुसरी कोणतीही सुसज्ज अशी तृतीय सार्वजनिक आरोग्य सुविधा नाही.परिणाम म्हणून संपूर्ण नांदेड जिल्ह्यातील ३३.६ लाख लोकसंखेपेक्षा जास्त (२०११ मध्ये लोकसंख्या ३३.६ लाख होती, आज मितीला या पेक्षा जास्तच असणार) तसेच महाराष्ट्रातील इतर जिल्हे,परभणी,हिंगोली, यवतमाळ आणि लातूर जिल्ह्यांतील शेजारील तालुके,तसेच तेलंगणा राज्यातील निर्मल,निजामाबाद आणि कामरेड्डी जिल्ह्यांतील रुग्ण आणि कर्नाटकातील बिदर जिल्हा येथील रुग्ण अनेकदा नांदेड GMC मध्ये उपचार घेतात.
नांदेड शासकिय वैद्यकिय महाविद्यालय हॉस्पिटल हायर लेव्हल,विशेष रेफरल सुविधा असल्याने,तसेच रुग्णांकडचे पैसे संपले कि येथे पाठवले जाते.वैद्यकीय महाविद्यालय हॉस्पिटल रुग्णांना प्रवेश नाकारू शकत नाही, त्या मुळे उपलब्ध सुविधा अतिशय तुटपुंज्या असूनही येणाऱ्या सर्व रुग्णांना येथे सामावून घेतले जाते.नांदेड शहर आणि जिल्ह्यातील १६ तालुक्यातील ग्रामीण भाग तसेच राज्यातील नांदेड शेजारील इतर जिल्ह्यांमधून सार्वजनिक आरोग्य सेवांच्या इतर स्तरांवरून रुग्णांना वारंवार GMC कडे पाठवले जाते.
नांदेडमधील इतर सार्वजनिक आरोग्य सुविधांमध्ये स्पेशालीस्ट केअर विशेषज्ञ सेवा अपुऱ्या आहेतच पण त्याबरोबरच बालरोग सुश्रुषा सेवा (पीडीअॅट्रिक केअर) पुरेश्या प्रमाणात उपलब्ध नसणे ही प्रमुख समस्यांपैकी एक आहे.नांदेडमधील इतर कोणत्याही सार्वजनिक आरोग्य सुविधेत बालरोग अतिदक्षता विभाग (आयसीयू) नसल्याचे दिसून आले होते.सिव्हिल हॉस्पिटलमध्ये केवळ एकच बालरोगतज्ज्ञ अशी अहवाल प्रकाशित करे पर्यंत स्थिती होती,या जिल्हास्तरीय रुग्णालयात बालरोग वॉर्ड नाही.नांदेडमधील महिला रूग्णालयात कार्यरत SNCU मध्ये एक बालरोगतज्ञ आणि तीन बालरोग वैद्यकीय अधिकारी होते.परंतु संपूर्ण जिल्ह्याची बालरोग उपचारांची वास्तविक गरज बघता जिल्ह्यातील दुय्यम (सेकंडरी) आणि तृतीयक (टर्रशरी) बालरोग सेवा अपुऱ्या असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले होते.साहजिकच या सार्वजनिक आरोग्य सुविधांमध्ये नवजात शिशुंसाठी कोणतीही विशेष इनडोअर काळजी दिली जात नसल्याने.पुन्हा सर्व आजारी नवजात शिशूंना शासकिय वैद्यकिय महाविद्यालय नांदेड येथेच पाठवले जाते.