किर्तीकुमार बुरांडे


वेगवेगळ्या शहरात वेगवेगळ्या प्रकारचे बाजार भरत असतात कुठे जनावरांचा बाजार भरतो तर कुठे वाहनांचा बाजार भरतो‌ पन आमच्या परभणीच्‍या शनिवार बाजारात चक्क मजुरांचा बाजार भरतो तोही दररोज नित्यनेमाने. न्याहरी सोबत घेऊन अथवा घरीच कोर कुटका खाऊन जवळपास तीनशे-चारशे मजूर सकाळी सात वाजल्यापासून शनिवार बाजाराच्या कोपऱ्यांवर येऊन बसतात या आशेने की आपल्याला कोणीतरी काहीतरी काम लावेल म्हणजे ते तेथे त्यांचे श्रमच विकायला बसलेले असतात.

हा बाजार गेल्या कित्येक वर्षापासून भरत आहेत आणि आम्ही मात्र त्यांच्या मधूनच वाट काढत पुढे जातो पण आम्हाला त्याचे काहीच वाटत नाही खरे तर एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत आणि त्यासाठी ते स्वतःला रस्त्यावर मांडून ठेवतात ही बाब जशी परभणी करण्यासाठी अशोभनीय आहे तसेच ती परभणीतील रोजगाराची बकाल अवस्था प्रदर्शित करणारा एक डाग पण आहे.     

मग लहान-सहान गुत्तेदार असतील अथवा कोणाच्या घरी डागडुजी आसेल किंवा कोणाला खोद कामाला मजूर हवे आसतील ते त्या बाजारात येतात आणि त्या मजुरांना घेऊन जातात त्या  माध्यमातून कोणाला नऊ ते दहा वाजेपर्यंत काम मिळते  तर कोणाला अकरा ते बारा वाजेपर्यंत काम मिळते पण ज्याला दुपारी दोन वाजेपर्यंत थांबून सुद्धा काम मिळाले नाही तो मजूर मात्र तोंडात मारल्यासारखा हिरमुसल्या चेहऱ्यांनी घराकडे फिरतो आणि हातावर पोट असणाऱ्या मजुराला रिकाम्या हाताने घरी जाणे म्हणजे अनेक समस्यांना तोंड देणे आहे. बघा इथे या मजुराची कष्ट करायची तयारी आहे पण त्याला काम नाही मिळू शकल्यामुळे लेकरा बाळांच्या नजरेत त्याला अपराधी व्हावे लागत आहे त्यातूनच काही जण दारू पितात अर्थात दारू पिणे या समस्येचे निरसन होऊ शकत नाही पण काही वेळासाठी तनाव मुक्तीचे साधन म्हणून ते तिच्याकडे पाहत असावेत या सगळ्या गोष्टीला कुठेतरी आमचे राज्यकर्ते आ शासन व्यवस्था जबाबदार आहे कारण पन्नास-शंभर कामगार एकत्र काम करतील असा एकही कारखाना परभणीत आमचे राज्यकर्ते निर्माण करू शकले नाहीत उलट जे काय तोडके मोडके उद्योग होते तेही आता बंद पडत आले आहेत.

आमची औद्योगिक वसाहत ओस पडली आहे. पूर्वी कृषी विद्यापीठाचा बराचसा आम्हाला आधार होता पण सतरा-अठरा वर्षांपूर्वी त्यांनी हजारो कामगारांना कामावरून काढून देशोधडीला लावले आहे तेव्हा पासून ते विद्यापीठ आमच्यासाठी फक्त मोठा वाडा आणि पोकळ वासा होऊन बसले आहे. बांधकाम व्यवसाय आणि हमाली व्यवसायात जेवढी मजूर सामावून घ्यायची क्षमता होती ती केंव्हाच पार झाली आहे आता त्यांचेच कसेबसे पोट भरणे चालू आहे त्या व्यतिरिक्त कामाच्या संधी परभणीत दिसत नाहीत त्यामुळे तर ऑटो रिक्षाच्या आणि हातगाड्याचा रस्त्याने रांगा लागल्या आहेत कारण पोटाची खळगी भरण्यासाठी काहीना काहीतरी धडपड करावी लागेल ना.    

 वास्तविक पाहता आमच्या परभणी जिल्ह्याला गोदावरी, दुधना, पूर्णा नद्यांच्या माध्यमातून समृद्ध वैभव प्राप्त झाले आहे त्यामुळे दुसर्‍या जिल्ह्याच्या तुलनेत आमच्या जिल्ह्याची जमीन खूप सुपीक आहे त्याचबरोबर जिल्ह्याच्या मधुमद आरपार लोहमार्ग आहे येवढेच नाहितर नऊ पैकी पाच तालुक्याला रेल्वे स्टेशन आहेत तरीही आम्ही शेतमाल प्रक्रिया उद्योगाला चालना देऊ शकलो नाहीत आमच्या राजकारण्यांची इच्छाशक्ती कमी पडली की ताकत माहीत नाही पण परिणामी जिल्ह्यात बेरोजगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे.आमच्या तरुण पोरांचा कसाबसा वेळ जाईल यासाठी राजकीय पक्षांनी वेगवेगळ्या आघाड्या काढून त्यांची सोय केली आहे म्हना परंतु घराची जबाबदारी असणाऱ्या कुटुंब प्रमुखाला मात्र या साऱ्या झळा सोसायच्या आहेत. भांडवली लोकशाहीत नेहमीच राज्यकर्ते संकटाला संधी समजत असतात तसच हे सारे मजूर आणि बेरोजगार आपल्या निवडणुकीच्या मिरवणुका सजवायला कामाला येतात याचे समाधान मानण्यापेक्षा शनिवार बाजाराच्या माध्यमातून लागलेला बेरोजगारीचा डाग पुसण्यासाठी येत्या काळात रोजगार निर्मितीच्या दिशेने पाऊल टाकणं आवश्यक आहे.


किर्तीकुमार बुरांडे  परभणी 9420625234

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here