परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कार्यपद्धतीचे वाभाडे निघालेले नेहमीच पाहायला मिळतात,आज जिल्हाधिकाऱ्यांना त्याचा प्रत्यय आला,त्याचे झाले असे की जिल्हा सामान्य रुग्णालयात नवीन स्थापित करण्यात आलेल्या अतिदक्षता विभागाची पाहणी करण्यासाठी आलेल्या जिल्हाधिकारी यांना कक्षाची चावी सापडत नसल्याने ताटकळत उभे राहण्याची वेळ आली.त्यात वीज पुरवठा खंडित झाल्याने आणखीच भर पडली.
सामान्य रुग्णालयातील नियोजनाचा अभाव हा नेहमीचा अनुभव आहे,वीज वितरण कंपनीच्या एक्स्प्रेस फिडर विद्युत पुरवठा केलेला असताना अशी वीज गायब होण्याचे प्रमाण नित्यचे आहे.रुग्णालय प्रशासन याला कधी गांभीर्याने घेत असल्याचे दिसून आलेले नाहीये.
तर राज्याच्या सार्वजनिक आरोग्य मंत्र्यांचा हस्ते उद्घाटन होणाऱ्या या अतिक्षता कक्षाची पाहणी करण्यासाठी आज दि.२५ रोजी जिल्हा रुग्णालयात अचानक भेट देण्यासाठी आलेल्या जिल्हाधिकारी आँचल गोयल यांना झालेला प्रकार पाहून मग राग अनावर झाला,त्यांनी अक्षरशः जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुहास जगताप यांच्या सह इतर प्रशनातील जबाबदार असणाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतल्याचे पाहायला मिळाले.
जिल्हाधिकाऱ्यांचा रुग्णालयात पाहणी कार्यक्रम चालू असताना सगळीकडे अंधार होता तरी त्यांनी सिटी स्कॅन विभाग,सोनोग्राफी विभागाची पाहणी करून पुन्हा अतिदक्षता विभागाकडे पाहणी केली पण अद्याप कक्षाची चावी मिळून न आल्याने पुन्हा इतर विभागात जाऊन पाहणी केली.दरम्यान वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले.वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून नेहमी प्रमाणे जुजबी उत्तरे देऊन वेळ निभावून नेण्याचा प्रयत्न करण्यात आला.पण वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अचानक केलेल्या पाहणी मुळे रुग्णांना सदा सर्वकाळ सहन कराव्या लागणाऱ्या प्रश्नावर भविष्यात काही उपाययोजना करण्यात येतील की पुन्हा येरे माझ्या मागल्या प्रमाणे कार्यपद्धती तीच राहते हे पाहणे औचित्याचे ठरणारे आहे.
श्रमिक विश्व न्यूज