परभणी शहरातील सुधारित वाढीव पाणी पुरवठा योजनेतील पाईप लाईन जोडणी पश्चात खोदकाम केलेली अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती न करता मनपा प्रशासनाकडून बकालीकरण वाढवले गेले आहे.
माहिती अधिकार कायद्याअंतर्गत प्राप्त माहितीनुसार शहरातील तीन प्रभाग समिती पैकी एका असलेल्या प्रभाग समिती ब मध्ये वयक्तिक नळ जोडणी करिता नागरिकांकडून रस्ते फोडण्याचे शुल्क प्रत्येक जोडणी मागे १५०० रुपये असे एकूण २३ लाख ७५ हजार दोनशे रुपये मनपा परभणी कडून जमा करण्यात आले.पण एक वर्षाचा कालावधी लोटला तरी अंतर्गत गल्ल्यांमध्ये फोडलेले रस्ते दुरुस्त करून देण्यात आले नाहीत.
परभणी शहर महानगपालिकेचा वतीने शहरातील सुधारित वाढीव पाणी पुरवठा योजनेच्या अंमलबजावणीत अनेक प्रभागांमध्ये नवीन पाणी पुरवठा करणारी पाईप लाईन अंथरण्याचे काम गत २०२१ वर्षा पर्यंत पूर्ण करण्यात आले.सदर वाढीव पाणी पुरवठा योजनेच्या अंमलबजावणीत प्रभागा अंतर्गत गल्यांमध्ये पाईप लाईन जोडणी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात खोदकाम करण्यात आले आहे.सदर काम करत असताना अनेक ठिकाणी गल्ल्यांमध्ये व्यवस्थित स्थितीत असलेले रस्ते फोडण्यात आले.साखला प्लॉट,लोहगाव रोड प्रभाग क्रमांक १६ मध्ये अनेक ठिकाणी गल्ल्यांमध्ये नवीन पाईप लाईन टाकण्यात आल्या नंतर फोडलेले रस्ते तसेच ठेऊन त्यांची दुरुस्ती करण्यात आली नाहीये.
परभणी शहर सुधारित वाढीव पाणी पुरवठा योजनेच्या अंतर्गत रस्ते फोडण्यात आल्या नंतर त्यांना दुरुस्त करून देण्याचे काम हे सदर कंत्रादारांकडून करणे अपेक्षित होते, तसी कामाची नियमावली लागू असताना परभणी महानगरपालिकेच्या प्रशासनाकडून कंत्राटदाराला काम केले नसतांना ही या एका वर्षात कधी विचारणा करण्यात आली नाहीये.परिणामी आता एक वर्षाचा कालावधी लोटला असताना मनपा प्रशासनाकडून सदर अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती करण्यात आली नाहीये व कंत्राटदाराकडून ही काम करण्यात आले नाही.यात मोठ्या प्रमाणात मनपा प्रशासनाकडून कंत्राटदारांना सवड देण्याचे काम करण्यात आले आहे.
अंतर्गत रस्त्यांची खोडकामे झाल्या नंतर वयक्तिक नळ जोडणी करिता मनपा प्रशासनाकडून प्रत्येक जोडणी करिता रस्ते फोडण्या बाबत दुरुस्ती खर्च वसूल करण्यात आला आहे.अंतर्गत गल्ल्यांमध्ये विरुद्ध दिशेला घर असणाऱ्यांसाठी १५०० ₹ अतिरिक्त दुरुस्ती खर्च वसूल करण्यात आला आहे.बाबत माहिती अधिकार कायद्याच्या अंतर्गत अतिरिक्त वसूल रक्कम बाबत माहिती घेतली असता केवळ प्रभाग ब मध्ये २३ लाख ७५ हजार दोनशे रुपये एवढी रक्कम मनपाने रस्ते फोडण्याबाबत पुन्हा दुरुस्ती करण्याच्या बाबत जमा केली आहे.सदर रक्कम सुद्धा प्रभाग ब अंतर्गत येणाऱ्या साखला प्लॉट भागात वापण्यात आली नाहीये,अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था तशीच असून रस्ते फोडल्या नंतर एक वर्षाचा कालावधी लोटला असताना दुरुस्ती करण्यात आलेली नाहीये.
परभणी शहर महानगपालिकेचा वतीने शहरातील नागरिकांना देण्यात येणाऱ्या किमान सुविधा दुरापास्त झाल्या असतांना अनेक वर्षांचे सुयोग्य स्थितीतले रस्ते हि चालण्यायोग्य राहिले नाहीयेत.शहरातील नागरिकांना अत्यंत बकाल असे जीवनमान नशिबी आले आहे. वाढीव पाणी पुरवठा योजनेच्या अंमलबजावणीत रस्ते फोडल्यानंतर करायच्या दुरुस्ती प्रकरणी विभागीय आयुक्त कार्यालाकडून चौकशी समिती गठित करून मनपा प्रशासनाच्या जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे.
श्रमिक विश्व न्यूज