परभणी – महिला व बाल विकास विभागाकडून राबविण्यात येत असलेल्या बालसंगोपन योजनेचे सन २०२१ मधील अनुदान शासनाने जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी परभणी यांच्याकडे मुदतीत पाठविले परंतु महिला व बाल विकास अधिकारी यांच्या कार्यालयाच्या निष्काळजीपणामुळे जवळपास आठ ते नऊ महिन्यापासून आलेले बाल संगोपन योजनेचे अनुदान लाभार्थ्यांचे खात्यावर जमा होत नसून विधवा महिलांना योजनेच्या अनुदानासाठी मागील आठ महिन्यापासून सारख्या चकरा माराव्या लागत आहेत. माहिती घेण्यासाठी आलेल्या संबंधीत महिलांना कार्यालयाच्या वतीने उडवा उडवीची उत्तरे दिली जातात. या बाबत अनेक लाभार्थी महिलांनी प्रहार जनशक्ती पक्षाकडे न्याय मिळणे बाबत लेखी तक्रार केली होती या तक्रारीची दाखल घेत प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या शिष्ट मंडळ व वंचित महिला लाभार्थ्यासह अप्पर जिल्हाधिकारी श्री. प्रताप काळे यांची भेट घेउन संबंधित प्रकरणी सखोल चौकशी करून जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी व कार्यालयातील संबंधीत विभागाच्या कर्मचाऱ्यांची चोकशी करून त्यांच्यावर कठोर कार्यवाही करून अनुदानापासून वंचित असलेल्या लाभाथ्र्यांना तात्काळ अनुदान दयावे या मागणीचे निवेदन दिले.
जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्या कार्यालयात चौकशी केली असता शासनाकडून स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेत एप्रिल-मे महिन्यात बाल संगोपन योजनेचे चेक जमा झाले परंतू महिला व बाल विकास कार्यालयाकडून लाभार्थ्याच्या बँक नोंदीच्या चुकीमुळे अनुदान रखडले आहे. जवळपास ३० ते ४० लाभार्थ्यांचे पैसे अजुनही मिळालेले नाहीत. मे महिन्यापासून आज पर्यंत जिल्हा व महिला बाल विकास अधिकारी यांनी सदरील लाभार्थ्यांच्या यादीची दुरूस्ती करून बँकेकडे दिलेले नाही. यामुळे संबंधीत लाभार्थी त्यांच्या शैक्षणिक गरजांपासून अनेक महिन्यापासून वंचित आहेत. अनुदान हे ९० दिवसाच्या आत वितरीत करण्यात यावे असा शासन आदेश असतांनाही व बाल कल्याण समितीने वेळेत आदेश देवूनही महिला व बाल विकास अधिकारी परभणी यांच्या हलगर्जीपणामुळे जिल्ह्यातील अनाथ बालके बाल संगोपन योजनेच्या लाभापासून वंचित आहेत अस ही निवेदनात म्हंटले आहे.
प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने, युवा आघाडी जिल्हा प्रमुख गजानन चोपडे, महिला आघाडी जिल्हा प्रमुख माधवीताई घोडके, शहर प्रमुख धर्मेंद्र तुपसंमिद्रे, शहर चिटणीस वैभव संघई, ऍड.संजय केकाण, ऍड. सुवर्णाताई देशमुख, सुषमाताई देशपांडे, शेख बशीर, संगीता गायकवाड, कन्होपात्रा जाधव, पुजा शिंदे इत्यादींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
श्रमिक विश्व न्यूज