
परभणी : (दि.24) केंद्र शासनाच्या दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत नागरी बेघरांना निवारा या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार,राज्याच्या नगर विकास विभागाच्या सनियंत्रण परभणी शहर महानगरपालिकेच्या आख्यारितीत चालवला जातो.येथील आश्रयास असलेल्या ज्येष्ठांना उच्च रक्तदाब कमी होण्याच्या महिन्याला लागणाऱ्या गोळ्याही नजीकच्या मनपा नागरी आरोग्य केंद्रात भेटत नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
- परभणी मध्ये सन 2018 पासून रेल्वे स्टेशन जवळ मनपा परभणीच्या जागेत चालवल्या जाणाऱ्या या नागरी बेघरांच्या निवाऱ्याला गत काही महिन्यापासून सेवाभावी संस्थेला,सेवाभावी तत्त्वावर चालविण्यात देण्यात आला आहे. नागरी बेघरांना निवारा या घटकांच्या अंमलबजावणी करिता महानगरपालिका क्षेत्रासाठी महानगरपालिकेचे आयुक्त यांची तर नगरपरिषदा क्षेत्राकरिता संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांची समन्वयक नोडल म्हणून नेमणूक असते.

काय परिस्थिती आहे बेघर निवाऱ्याची ?
शहरातील एकही बेघर निवाऱ्याविना राहू नये या दृष्टीकोनातून कायमस्वरूपी तसेच तात्पुरत्या निवार्याचे नियोजन करणे दर पंधरा दिवसांनी शहरी बेघरांच्या सद्यस्थितीचा आढावा घेणे,याबाबत संपूर्ण मासिक अहवाल राज्य अभियान व्यवस्थापन कक्षात सादर करण्याचा सूचना आहेत.नागरी बेघरांना निवारा या विषयासंदर्भात प्रगतीचे सनियंत्रण करण्यासाठी राज्यस्तरीय समितीची स्थापना करण्याबाबत ही महाराष्ट्र शासन नगर विकास विभागाचे शासन निर्णय आहेत. निराश्रित मुले,वृद्ध,अपंग,मानसिक आजारी आणि गंभीरपणे आजारी बरे करून बेघर आश्रयस्थानामध्ये विशेष विभाग आणि त्यासाठी विशेष सेवा ही तरतूद असताना मनपाच्या या सेवाभावी तत्त्वावर चालविण्यात येणाऱ्या बेघर निवार्यातील वृद्धांना हाकेच्या अंतरावर असणाऱ्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात साधे उपचार सुद्धा मिळत नसल्याचे दिसून आले आहे.
आज घडीला 20 पेक्षा अधिक बेघर निवार्यात आश्रित असल्याचे सांगण्यात येत असले तरी खरी परिस्थिती निश्चित नाहीये.निराश्रीतांच्या दोन वेळीच्या मूलभूत जेवणाची प्रतिपूर्ती करण्यात संपूर्ण वेळ समाजातील दानशूर शोधण्यात जात असताना इतर उपाययोजनांसाठी साहजिकच व्यवस्थापन कसा वेळ काढत असेल हा सुद्धा प्रश्नच आहे ?
बेघर निवाऱ्याच्या निकषानुसार पुरेसा संरक्षणात्मक उपाययोजना,प्रथमोपचार किट,सामान्य मनोरंजन जागा,वैयक्तिक स्टोरेज स्पेस साठी वैयक्तिक लॉकर्स या बाबी तर दुरान्वेही साध्य होत असतील असे प्रतीत होत नाहीये. प्रत्येक निवारागृहात दररोज देखभाल करण्यासाठी पूर्ण वेळ किमान तीन काळजी घेणारे माणसं,निवास व्यवस्थापन,देखभाल स्वच्छता आणि शिस्त यासाठी संस्था शासकीय अर्थसहाय्या शिवाय कसे नियोजन करत असेल हा यक्ष प्रश्न आहे.त्यात निवार्यातील विशेषतः जेष्ठांच्या आपत्कालीन उपचारासाठी तारेवरची कसरत नित्याची असल्याची परिस्थितीवरून दिसते.बेघर निवार्याच्या अगदी जवळ असलेल्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर उपलब्ध नाहीये,निवाऱ्यातील उपस्थित एका ज्येष्ठ महिलेला उच्च रक्तदाबाच्या लागणाऱ्या नियमित गोळ्या इथे भेटत नसल्याचे त्यांनी प्रस्तुत प्रतिनिधीला सांगितले.