मराठी कवितेला स्वप्नरंजनातून बाहेर काढून वास्तववादी बनविण्याच काम सुर्वेसरांनी केले.

    मराठी कवितेला सामाजिक भान त्यांनी दिले.

    Narayan Surve Sir
    श्रमिक विश्व विनम्र अभिवादन

    ” एकटाच आलो नाही युगाची साथ आहे.
    सावध असा तुफानाची हीच सुरूवात आहे.
    कामगार आहे मी तळपती तलवार आहे.
    सारस्वतांनो ! थोडासा गुन्हा करणार आहे.”

    असे म्हणत मार्क्सवाद हाताशी धरून मराठी कवितेला स्वप्नरंजनातून बाहेर काढून वास्तववादी बनविण्याच काम सुर्वेसरांनी केले.मराठी साहित्यात दलित-शोषितांच्या वेदनेला, दु:खाला स्थान मिळवून देण्यात ते यशस्वी ठरले. त्यांच्या कविता कामगार जाणिवेन भारलेल्या, साम्यवादी राजकीय बांधिलकी मानणार्‍या आहेत.ते जीवनवादी कवी होते. प्रतिभा ही खडतर जीवनतून अधिक परिपक्व होते, स्वतःकडे आणि समाजसंबंधांकडे डोळसपणे पाहिल तर ती द्विगुणित होते याच उत्तम उदाहरण म्हणजे कवी नारायण सुर्वे.

    मराठी कवितेला सामाजिक भान त्यांनी दिले. मराठी कवितेला मध्यमवर्गीय वर्तुळातून, केवळ सौंदर्यवादी दृष्टीकोनातून बाहेर काढून जीवनवादी बनविले. शब्दांचा वापर हत्यारांसारखा करून आपल्या कवितेतून समस्त कामगार, कष्टकरी वर्गाची, स्त्रियांची वेदना ताकदीने मांडण्याची हातोटी सुर्व्यांकडे होती. म्हणूनच एक लोकाभिमुख कवी म्हणून सुर्वे यांचे वर्णन केले जाते.
    त्यांच्या कवितेत लोकमानसाची भाषा त्यांनी वापरलेली दिसते. ते स्वतः जसे जगले, त्यांनी जे अनुभवले, पाहिले ते त्यांनी प्रभावीपणे आपल्या काव्यात मांडले. म्हणूनच त्यांच्या कविता काळजाला भिडणार्‍या जिवंत वाटतात.

    आपल्या सार्‍या आयुष्यात त्यांनी माणसांना महत्त्व दिल. म्हणूनच त्यांच्या कवितेत डोंगरी शेतात राबणारी माय, बोगद्याच्य चाळीतील माणसे, नालबंदवाला याकूब, दाऊद शिगवाला, हणम्या, इसल्या, पोटाची खळगी भरण्यासाठी सह्याद्रीचा कडा उतरून मुंबईत कामधंदा शोधत आलेला व समुद्रातीरावर झुंजत मरण पावलेला कष्टकरी बाप, आपल्या तारुण्यातील पराक्रम ऐकविणारा बाप, गोदीवर काम करणारा अफ्रिकन चाचा ,’मास्तर माझ्या पोराच्या बापाच्या जागी कनच्याबी देवाच नाव लिवू नका,तर माणसाचच नाव लिवा” अस म्हणणारी वारांगना, काळ्याघोड्याजवळ गर्दी करणारे श्रमिक मोर्चेकरी, चंद्रा नायकीण, अशा सर्व सामान्य माणसांच चित्रण आढळत. त्यांची कविता मुंबईच्या फुटपाथवर, कापडाच्या गिरणीत, शेताच्या बांधावर आणि एकूणच जगण्याच्या लढाईतून जन्माला आली. समाजातल्या अगदी शेवटच्या थरातील माणसाविषयी त्यांना असणारी कणव त्यांच्या कवितेतून जाणवते.उपेक्षितांच्या प्रश्नांना आवाज देण्याची ताकद त्यांच्या शब्दात, उपमांतून आढळून येते.

    कवी सुर्वे एके ठिकाणी म्हणतात, “माझी कविता केवळ माणसांसाठीच आहे. लढून समाज बदलणार्‍यांसाठी आहे.” म्हणूनच माणसांवर प्रचंड श्रद्धा व्यक्त करणार्‍या सुर्वे सरांच्या अनेक कविता माणुसकी मागण्यासाठीच्या लढायात हत्यार होऊन तळपत राहिल्या आहेत. आपल्या पुरोगामी विचारांच्या मुशीतून निघालेल्या शब्दातून सुर्वे सरांनी मराठी कवितेला सामाजिक बांधिलकीचा विशाल आशय प्राप्त करून दिला.मराठी कवितेला रोमँटिक युगातून बाहेर काढून वास्तववादाकडे नेण्याचे ,सामाजिक भान देण्याचे महान काम सुर्वे यांनी केले.

    अवघ्या महाराष्ट्राच्या हॄदयाला आणि बुद्धिला चेतवणारा लोकोत्तर कवी म्हणून नारायण सुर्वे ओळखले जातात. त्यांच्या कवितेत पारदर्शकता आहे. संभाषणात्मक कवितेचे देणे त्यानीच मराठी साहित्याला दिले. काव्यविभोर शैली, नादलयतालाने युक्त अशी साधी सोपी रसाळ भाषा, ही त्यांच्या कवितेची वैशिष्ठ्ये आहेत. अपल्या कवितेतून राजापुरी वळणाची मालवणी भाषा, तलकोकणची बोली भाषा त्यांनी सर्वदूर पसरविली. त्यांच्या कवितेत मार्क्सवादाचा सूर दिसतो. तरीपण त्यांच्या कवितेत प्रचंड प्रतिभा आणि ऋजुता आढळते.

    नारायण गंगाराम सुर्वे
    (ऑक्टोबर १५, १९२६ – ऑगस्ट १६, २०१०)

    श्रमिक विश्व

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here