सद्यस्थितीत समाज व्यवस्थेची “विकास” या संकल्पनेच्या नावाने ज्या प्रकारे वाटचाल चालू आहे..ती पूर्णपणे असमाधानकारक आहेच. सर्वसामान्यांना “विकास” असा शब्द जरी उच्चरला तरी भीती वाटायला लागते. विकासाच्या नावाखाली राजकीय मुल्यांची घसरण करून ठेवली आहेच. पण आर्थिक आणि सामाजिक मुल्यांची देखील मोठी घसरण केली आहे. विकास संकल्पनेत “मानवी मुल्य” या घटकाला खूप महत्त्व आहे. पण ते महत्व जाणीवपूर्वक कमी केले जात आहे. मानवी मूल्यावर आघात करणे चालू आहे. आर्थिक, राजकीय आणि अस्मितादर्शक हितसंबंधांच्या प्रश्नांवरून प्रत्येक समाज घटक एक-दुसऱ्या समाज घटकांना द्वेषाने आणि संशयाच्या नजरेतून पाहण्याच्या उंबरठ्यावर आहे. त्यामुळे समाज व्यवस्थेचे खूप मोठे नुकसान होत आहे. तरीही राजकीय नेतृत्वाकडून विकास नावाच्या घटकांवर सामन्याची दिशाभूल करणे चालू आहे. सामान्य नागरिकांना मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी खूप संघर्ष करावा लागत आहे. तर दुसरीकडे उधळपट्टी उच्च वर्गाकडून चालू आहे. तरीही सर्वसामान्यमधील एक मोठा वर्ग (संख्येने) अजूनही विकास या घटकाला धरून बसलेला आहे…खूपच आशावादी आहे. नेतृत्वाकांकडून विकास या घटकांचा वापर सरधोपट वापरला जातो… जे वापरतात ते त्यांच्या सोयीने आणि हितसंबधन जोपासण्यासाठी. मात्र सर्वसामान्यांना आपल्यासाठीच आहे असा समज करून घेण्यास भाग पाडले आहे.
“विकास” ही संकल्पना दोन परस्पर विरोधी दृष्टिकोनातून राजकीय व्यवहारात वावरत आहे.
- एक म्हणजे देशाच्या “घरेरू उत्पादनात (GDP) वाढ ” म्हणजे विकास. या वाढीचा वेग जेवढा जास्त , तितका विकास जास्त. जगातील इतर देशातील उत्पादनात व व्यापारात यशस्वी स्पर्धा करणे , निर्यात वाढवणे, त्यासाठी तंत्रज्ञान , यंत्रसामग्री जेथे मिळेल तेथून आणणे हा विकासाचा मार्ग आहे.
- देशातील सर्व जनतेचे विशेषतः जे बहुसंख्यांक परंतु दरिद्री, अतिदारिद्री, गरीब, दुबळे आहेत. त्यांचे जीवन सर्वांगीण चालू स्थितीपेक्षा जास्त सुखाचे, समृध्द व्हावे , त्यांना शिक्षण, सामाजिक समता-न्याय-सुरक्षा मिळावी, विकासाचा वाटा सापडव्यात, सर्वांगीण सक्षम व्हावेत, त्यांचे शोषण व विषमता कमी व्हावे म्हणजेच विकास . (विकास संकल्पनेकडे इतरही दृष्टिकोनातून पाहता येईल. पण पोस्ट लिहिण्याच्या सोयीने मांडणी केली आहे.) या दोन्ही संकल्पना एकमेकांच्या हातात हात घालून राबवण्यात येत असल्याचा भास निर्माण केला जातोय का ?. अंमलबजावणीमध्ये दुसऱ्या संकल्पनेला खूपच दुय्यम स्थान दिले आहे. तसेच इतरही अनेक प्रश्न असल्याचे आपल्याला दिसून येतील… प्रश्न असा आहे की “विकास ” या घटकविषयी सर्व सामान्य नागरिकांना काय वाटत असेल? आता कोणत्या भावनेतून पाहत असतील? त्यांच्या या घटकांवर विश्वास तर उडायला लागला नसेल ना ?….
या दोन विकासाच्या बाजू/ व्याख्या/ संकल्पना आहेत. यातील नेमकी कोणती योग्य मानायची याविषयी सर्वच राजकीय नेतृत्वामध्ये स्पष्टता नाही. काही नेतृत्वाला या मधील विरोधाभास कळतो, पण हितसंबध जोपासण्यासाठी मागास घटकांकडे दुर्लक्ष करून एक नंबरच्या विकास संकल्पना राबवण्यास मान्यता दिली आहे. ही एक नंबरची संकल्पना ही विशिष्ट समूहाचे, विशिष्ट वर्गाचे हितसंबध जोपासणारी आहे… त्यामुळे सामान्य नागरिकांनी पुढे येऊन नेतृत्वाला या विकास संकपलनेविषयी प्रश्न विचारला पाहीजेत तरच राजकीय नेतृत्वामध्ये विकासाविषयी गांभीर्य येईल… नाहीतर आहेच मानवी मुल्यांची घसरण चालू… ही घसरण किती होईल या विषयी आताच भाष्य करता येणार नाही…. आत्मचिंतन करण्याची हीच वेळ आहे….
सोमिनाथ घोळवे.