परभणी : (दि.०१) भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या जाहिरातीत आणि शासन निर्णयात नसलेल्या अटी लाऊन शेकडो विद्यार्थ्यांना समाज कल्याण विभागाने अपात्र केल्याचा आरोप करत वंचित बहुजन आघाडीच्या युवक जिल्हाध्यक्षांची समाज कल्याण परभणी सहाय्यक आयुक्त यांच्या निलंबनाच्या मागणीसाठी परभणी जिल्हा समाजकल्याण कार्यालयाला दिनांक ५ ऑक्टोबर रोजी टाळा ठोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.वंचित बहुजन आघाडी युवक जिल्हाध्यक्ष तुषार गायकवाड यांच्या स्वाक्षरीने प्रसिद्धी पत्रक माध्यमांना देण्यात आले आहे.
अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील वस्तीगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधांसाठी आणि मॅट्रिककत्तर शिक्षण घेता यावे याकरिता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना आहे.
स्वाधार योजनेच्या अंमलबजावणीसाठी वंचित बहुजन युवक आघाडी कडून करण्यात आलेल्या उपोषण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वरिष्ठ स्तरावरून आठ महिन्यांचा कालावधी लोटूनही ठोस कारवाई करण्यात आली नसल्याने परिणामी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्षे संपत असताना विद्यार्थी योजनेपासून वंचित असल्याचा पत्रकात नमूद करत समाज कल्याण विभागाने प्रकाशित केलेल्या योजनेच्या जाहिरातीत आणि शासन निर्णयात नसलेल्या अटी नियम लावून अनेक विद्यार्थ्यांना योजनेपासून अपात्र करण्याचे काम समाज कल्याण सहाय्यक आयुक्त यांनी केले असल्याचा आरोप करून निलंबनाच्या मागणीसाठी टाळा ठोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.