नाशिक : (दि.१५) निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक जितेंद्र भावे यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे.समाज माध्यमांवर फेसबुक लाईव्ह करून शासकीय,खाजगी व्यवस्थापनातील उणिवांवर बोट ठेवत सामान्य नागरिकांना दिलासा देण्याची त्यांची कार्यपद्धती अनेकांना खटकते आहे.त्यातल्या त्यात ‘जनताच मालक’ हे त्यांचे आवाहन जसे व्यवस्थेने दाबले गेलेल्यांना आश्वासक वाटते,तिथेच ते भ्रष्ट कार्यपद्धती करून मनमानी करत नागरिकांवर हुकूमशाही लादलेल्यांना खटकते आहे.
आपल्या देशाच्या सार्वभौम लोकशाही स्वातंत्र्याला पंचाहत्तर वर्षे होऊन गेली असताना इंग्रजांच्या काळात असलेला अधिकारी बाणा काही करून इथल्या प्रशासकीय यंत्रणामधून जायला तयार नाहीये.जनता ही याचकाच्या स्वरूपात आणून सोडली आहे,शासकीय कारभार संगनमत करून एका वर्गाचे हित जोपासण्यात गर्क आहे.जनतेच्या करातून निर्माण होणाऱ्या पैश्यात पोसल्या गेलेल्या या यंत्रणेला नागरिकांच्या प्रती उत्तरदायी असणे कमीपणाचे वाटते आहे. शासन एका बाजूला डिजिटल इंडियाचे ढोल वाजवत असताना समाजातील शेवटच्या घटकाचे जगणे मुश्किल होऊन बसले आहे.
शासन स्तरावरून निर्माण केलेले लोकोपयोगी कायदे,कानून नियम संकेत सगळे गुंडाळून जनतेला ताटकळत ठेवण्यात आणि त्याकडून वरकमाईची भ्रष्ट अशी समांतर व्यवस्था निर्माण झालेली आहे.इथे एकट्या दुकट्या माणसाचे प्रतिकाराचे सर्व मार्ग क्षीण ठरले आहेत.पोलिस ठाण्यात लोकांना न्याय मिळण्यापेक्षा त्यांना असुरक्षित अधिक वाटेल,आपले कोणी ऐकेल याची सामान्य नागरिकांना अपेक्षा राहिली नाहीये.कुठेही जा गरीब,वंचित घटक याची फरफट नित्याची बाब करून ठेवली गेली आहे.ज्यांची हितसंबंध जोडले गेली आहेत त्यांनी लोकांना वेठीस धरण्याची कोणतीच कसर शिल्लक ठेवली नाहीये.या प्रकाराला थेट भिडण्याची आता सरकारात ही हिंमत उरली नाहीये अशी एकंदरीत परिस्थिती आहे.जिकडे तिकडे पैसा आणि ओरबाडने कायदेशीर झाले की काय अशी अवस्था आहे.
अश्यात एखादा प्रामाणिक माणूस या व्यवस्थेला कोणतीही साधन सामुग्री,आर्थिक पाठबळ नसताना केवळ परिवर्तनाच्या दिशेने निघालेल्या मूठभर लोकांना सोबत घेऊन भिडतो आहे हेच इथे अनेकांना खटकते आहे.म्हणून मग त्यांच्यावर जरब बसेल,त्यांनी आरंभलेल्या कामत व्यत्यय येईल,अशा लोकांचे आत्मविश्वास क्षीण होतील यासाठी अश्या गुन्हे दाखल करण्याच्या,धाक निर्माण करून सामान्य माणसाला नामोहरम करण्याचा प्रयत्न केला जातो आहे.पण लोकांनी जर स्वतःच्या हातात ही परिवर्तनाची मशाल घेतली तर जनताच मालक आहे हे सिद्ध करायला अधिक वेळ लागणार नाही,याची जाणीव भ्रष्ट लोकांनी ठेवावी.