कोरोनात जन्मापूर्वीच वडील गमावलेली अभागी गौरी….
कोरोना काळात घरच्या कर्त्या माणसांना गमावलेल्या कुटुंबांची मोठी वाताहत झाल्याचे प्रसंग समोर आले.या महामारीच्या पश्चात सरकार दरबारीही मागे राहिलेल्या घरातील माणसांच्या बाबत ठोस उपाययोजना करण्याची गरज अधोरेखित झाली आणि हळू हळू योजना ही कार्यन्वित होऊ लागल्या आहेत, पण …!
कोरोना महामारीच्या कारणाने निर्माण झालेल्या अनेक शोकांतिका समोर येतच आहेत आणि,अनेक दुःखद,हळहळ निर्माण करणाऱ्या कहाण्या प्रसारमाध्यमे,समाज माध्यमावर वाचून समाज पुढे चालत आहे.परंतु काही ठिकाणी या अवस्थेला सुधारण्याची ही मोहीम आता जोर धरते आहे आणि त्याला भरभरून मदत ही देणारे पुढे येत आहेत.
अशीच एक फेसबुक या समाजमाध्यमावर हेरंब कुलकर्णी यांच्या पोस्ट बाबत घडले आहे.एका आव्हानाला प्रतिसाद देत,एका दिवसात ९० हजार रुपये चिमुकल्या “गौरी” साठी जमा झाले आहेत.
काय होती हेरंब कुलकर्णी यांची पोस्ट ?
नुकताच गौरीचा सण झाला..गौरी ही समृद्धी संपत्तीचे प्रतिक आहे परंतु अनाथ विधवा झालेल्या कुटुंबात आज एका अभागी गौरीची भेट झाली. अश्विनी गिरी या महिलेच्या पतीचे कोरोनात निधन झाले. मे महिन्यात ६ महिन्याची गरोदर होती.२ ऑगस्टला तिला मुलगी झाली. जन्मापूर्वीच तिचे कोरोनाने पितृछत्र हरपले. मे महिन्यात बाळाची वाट पाहणाऱ्या अश्विनीला नवऱ्याचा मृत्यू बघावा लागला. त्या दुःखात तिने अडीच महिने काढले.मी कवी असूनही तिने गरोदरपणात शेवटचे दिवस कसे काढले असतील ? त्यातही तिला बीपी असल्याने सीझर करावे लागले. तीस हजार रुपये खर्च आणि नवर्याच्या आजारपणात सात लाख रुपये खर्च झाला..
गिरी कुटुंब भटक्या विमुक्त जमातीतील. शेतीही इनामी जमीन. अतिशय अल्प उत्पन्न. मुलगा कसा तरी पुण्यात एका कंपनीत नोकरीला लागला आणि ७ लाखाचे कर्ज करून कोरोनात आत्ता मृत्यू झाल्यामुळे पुणे सोडून आता गावाकडे यावे लागले.. अगोदरचा एक सहा महिन्याचा मुलगा आणि आता बाळंतीण होऊन झालेली ही अभागी गौरी
त्या महिलेला मुलीच्या जन्माचा आनंद घेता आला नाही. या मुलीच्या भवितव्याचे काय ? याचेच काहूर तिच्या चेहऱ्यावर भेसूरपणे मला दिसत होते. सिझर झाल्याने आता ती कामही करू शकत नाही.
तिची वृद्ध आई आज मजुरी करते. आमच्यासमोर नुकतीच ती कामावरून आली होती. तिची आजीही अजून जिवंत आहे. आजी आई आणि मुलगी तिघीही विधवा होऊन एकाच घरात राहत आहेत आणि कसेतरी घर चालवत आहेत.. कोराणाने अनेक मृत्यू दाखवले परंतु कोरोनात कुटुंबातला हा जन्म बघून अधिकच वेदना झाल्या की त्या जन्माचे स्वागत करण्याच्या कोणीच मन:स्थितीत नाही फक्त ती गौरी मात्र या साऱ्या दु:खात अनभिज्ञ असल्याने आनंदाने हसत खेळत होती. तिचे ते हसणे सुद्धा गलबलून टाकत होतं
गौरी च्या भवितव्याची समाज म्हणून आपण जबाबदारी घेऊ या
केवळ तिच्या नावावर एक विशिष्ट रक्कम तरी आपण सर्वांनी मिळून टाकली तरी सुकन्या योजनेत तिच्या नावाने पैसे गुंतवता येतील व किमान एका कुटुंबातील एका मुलीच्या जगण्याला आपण आधार देऊ शकतो… गौरीच्या भवितव्यासाठी आपण मदत करू इच्छित असाल तर माझ्या 9270947971 या google pay वर आपण जरूर पैसे पाठवा.. मी सर्व रकमेचा हिशोब सादर करीन. यावेळी सोबत माझे मित्र नितीन जोशी व श्रेयस जोशी होते..
अडीच कोटी कुटुंबे असलेल्या महाराष्ट्रात ही २०,००० कुटुंब सावरणे नक्कीच कठीण नाही.
दि.२० सप्टेंबर रोजी प्रसारित करण्यात आलेल्या या पोस्टवर अनेक संवेदनशील नागरिकांनी प्रतिसाद देत,आर्थिक मदत देणे सुरू केले आणि एका दिवसात ९० हजार रुपये जमा झाल्याचे हेरंब कुलकर्णी यांनी कळवले आहे.समाजमाध्यमा वरील एवढा प्रतिसाद बघून स्वतः समाजाच्या सद्भावनेची प्रचीती येते आहे.”गौरी” साठी मदत करणाऱ्या नागरिकांची यादी ही पुढे पोस्ट करण्यात आली असून ५० रुपयांपासून १० हजार रुपयांपर्यंत अनेकांनी थेट मदत पाठवली आहे.
गौरीच्या भवितव्यासाठी आपण मदत करू इच्छित असाल तर हेरंब कुलकर्णी यांच्या 9270947971 या google pay वर आपण जरूर पैसे पाठवा असे आवाहन करण्यात आले आहे.
श्रमिक विश्व न्यूज