पुणे : ( दि.२२) बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेतील कर्मचारी सध्या प्रामुख्याने नोकर भरतीच्या प्रश्नावर आंदोलन करत आहेत. या आंदोलनाचा एक भाग म्हणुन कोरोना महामारी च्या पार्श्वभूमीवर या संघटनांच्या वतीने आज बँकेचे मुख्यालय लोकमंगल समोर धरणे कार्यक्रम संघटित करण्यात आला. गेल्या अनेक वर्षांपासून बॅंक, निवृत्ती, राजीनामा, पदोन्नती या मुळे रिकाम्या झालेल्या जागा देखील भरत नाही ज्या काळात बँकेने अनेक नवीन शाखा उघडल्या आहेत, व्यवसाय वाढला आहे. यामुळे बँकेत आज अनेक शाखेतून सफाई कर्मचारी, शिपाई ही पदे रिक्त आहेत. या जागांवर वर्षोनुवर्षे तात्पुरते कर्मचारी काम करत आहेत ज्याना किमान वेतन देखील दिले जात नाही.
या शिवाय अनेक शाखेतून पुरेसे क्लार्क नाहीत त्यामुळे कर्मचार्यांना तणावाखाली काम करावे लागते. याचा ग्राहक सेवेवर देखील विपरीत परिणाम होत आहे . याचा बँकेच्या व्यवसायावर देखील अनिष्ट परिणाम होत आहे. बँकेने त्वरित पुरेश्या प्रमाणात क्लार्कची भरती करावी अशी मागणी करण्यात येत आहे. या बरोबरच बँकेने महत्त्वाच्या शाखेतून सुरक्षा रक्षक नेमावेत अशी देखील मागणी संघटनांच्या वतीने करण्यात येत आहे. व्यवस्थापनाने या न्याय मागण्या मान्य केल्या नाहीत तर या संघटनांनी 27 सप्टेंबर रोजी एक दिवसाचा तर ऑक्टोबर महिन्यात दोन दिवसाच्या संपाची हाक दिली आहे.
आजच्या धरणे कार्यक्रमात युनाइटेड फोरमच्या संघटनांचे देशभरातील प्रतिनिधी हजर होते. सकाळी ११ ते ३ वाजेपर्यंत झालेल्या या धरणे आंदोलनास बँकेचे कार्यकारी संचालक श्री. ए.बी.विजयकुमार यांनी भेट दिली. फोरमच्या वतीने समन्वयक धनंजय कुलकर्णी यांनी श्री. विजयकुमार यांना निवेदन दिले, ज्याविषयी बोलताना त्यांनी याप्रश्नी उच्च व्यवस्थानाकडे पाठपुरावा करून प्रश्नांची सोडवणूक करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर त्याच ठिकाणी गेट मिटिंग पार पडली. एन. ओ. बी. डब्ल्यू चे प्रतिनिधी श्री. महाबँक कर्मचारी सेनेचे अध्यक्ष नितीन रेगे आणि ऑल इंडिया फेडरेशनचे श्री. धनंजय कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले व हि एकजूट अशीच कायम ठेऊन दि. २७ सेप्टेंबरचा देशव्यापी संप यशस्वी करण्याचे आवाहन केले.
ऑल इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज फेडरेशन,बँक ऑफ महाराष्ट्र कर्मचारी महासंघ,बँक ऑफ महाराष्ट्र कर्मचारी सेना
महाबँक नवनिर्माण सेना या संघटनांच्या नेतृत्वाखाली कर्मचारी,अधिकाऱ्यांनी या आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे आजच्या या आंदोलनास सक्रिय पाठींबा देण्यासाठी बँकेतील दोन्ही अधिकारी संघटनांचे प्रतिनिधी श्री. राजीव ताम्हणे, श्री. विराज टिकेकर, श्री. गदादे , भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस श्री. रघुनाथ कुचिक , भारतीय मजदूर संघाचे सरचिटणीस श्री. रवींद्र देशपांडे या प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती.
श्रमिक विश्व न्यूज