परभणी – तालुक्यातील परभणी ते संबर रस्त्यावर वरील मटकराळा ते संबर या रस्त्याची अवस्था अत्यंत वाईट झाली असून मागील पाच ते सहा वर्षापासून या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत त्यामुळे या रस्त्यावरुन प्रवास करणाऱ्या संबर, पिंपळगाव टोंग, देवठाणा व सावंगी खुर्द या गावातून बाहेर गावी शिक्षणासाठी जाणाऱ्या शाळकरी विद्यार्थ्यांना व परभणीला कामासाठी येणाऱ्या नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. शिवाय या तीन – चार गावात एखादा आजारी व्यक्ती आसल्यास त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेने देखील शक्य होत नाही.
मटकऱ्हाळा ते संबर रस्त्याची दुरुस्ती करा म्हणून संबर, पिंपळगाव टोंग, देवठाणा व सावंगी खुर्द येथिल नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वेळोवेळी तक्रारी दाखल केल्या होत्या परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाने या तक्रारींची अजिबात नोंद घेतली नाही.
मटकऱ्हाळा ते संबर या रस्त्याची दुरुस्ती तात्काळ करण्यात यावी या मागणीचे निवेदन प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांनी पक्ष पदाधिकाऱ्यांच्या शिष्ट मंडळासह सार्वजनिक बांधकाम विभाग परभणीचे कार्यकारी अभियंता श्री. पाटील यांची भेट घेउन त्यांना देण्यात आले होते व रस्ता दुरुस्तीचे काम तात्काळ सुरु न केल्यास प्रहार जनशक्ती पक्ष व संबर, पिंपळगाव टोंग, देवठाणा व सावंगी खुर्द येथील नागरिकांसह दि. १९ सप्टेंबर २०२२ रोजी रस्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला होता.
प्रहार जनशक्ती पक्षाच्या या निवेदनाची सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ दखल घेतली व काल दिनांक १७ सप्टेंबर २०२२ रोजी प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची व सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. पाटील तसेच विभागीय अभियंता श्री. विघ्ने यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रहार जनशक्ती पक्षाच्या निवेदनानंतर लगेचच सार्वजनिक बांधकाम विभागाने मटकराळा ते संबर या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले असून या रस्त्यावर असलेल्या मासोदा पुलावरील खड्डे बुजवण्याचे काम पूर्ण झाले आहे व या रस्त्यावरील उर्वरित सर्व दुरुस्ती ची कामे खड्डे ३० ऑक्टोबर २०२२ पर्यंत पूर्ण केले जातील असे लेखी आश्वासन दिले व प्रहार जनशक्ती पक्षाचे नियोजित रास्ता रोको आंदोलन स्थगित करण्याची विनंती केल्या नंतर प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांनी पक्षाचे दि. १९ सप्टेंबर २०२२ रोजी चे रस्ता रोको आंदोलन तात्पुरते स्वरूपात स्थगित करण्यात आले असून सार्वजनिक बांधकाम विभागाने जर ठरवून दिलेल्या वेळेत रस्त्याच्या दुरुस्तीचे काम पूर्ण केले नाही तर प्रहार जनशक्ती पक्ष परत आंदोलन उभे करेल अशी माहिती दिली.
या वेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख शिवलिंग बोधने, युवा आघाडी जिल्हाप्रमुख गजानन चोपडे, महिला आघाडी जिल्हा प्रमुख माधवीताई धोडके, तालुका प्रमुख ज्ञानोबा, शहर प्रमुख धर्मेंद्र तुपसमुद्रे, महिला आघाडी शहर प्रमुख आरतीताइ जुंबडे, महिला आघाडी उप शहर प्रमुख महानंदाताई माने, शहर चिटणीस वैभव संघई, उद्धव गरुड, सय्यद युनूस, शेख बशीर, सचिन शेरे इत्यादी उपस्थित होते.
श्रमिक विश्व न्युज