सामंजस्य करार झाला,पण सात महिने का रडखडला हा प्रश्न गुलदस्त्यात …

स्वतंत्र लेखाशीर्ष व निधी यासह ३२ मुद्दे करारात नमूद.

सामंजस्य करार पूर्णत्वास

परभणी : (दि.२०) शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची इमारत पूर्ण होण्यासाठी वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाने आवश्यक ते नियोजन व निधीची तरतूद केलेली आहे.सदरच्या कामास प्रशासकीय मान्यता प्राप्त होऊन प्रत्यक्षात बांधकाम सुरू होण्यास काही अवधी लागणार आहे.याकरिता राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाची मान्यता मिळण्यास अडचणी येऊ नये म्हणून रुग्णालयाच्या इमारतीचा वापर वैद्यकीय महाविद्यालयाच्या मान्यता करण्यात येईल,या सह अनेक बाबी या सामंजस्य करारात अंतर्भूत असल्याने या कराराचे महत्व आहे.

महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाचा 22 मार्च 2022 चा निर्णय आणि वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाच्या 28 मार्च 2022 च्या शासन निर्णय यांच्या अनुषंगाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय परभणी टप्प्याटप्प्याने सार्वजनिक आरोग्य आरोग्य विभागाकडून वैद्यकीय शिक्षण विभागाकडे तात्पुरता स्वरूपात हस्तांतरित करण्याची प्रक्रिया पार पडत असताना रुग्णहीत लक्षात घेऊन वैद्यकीय सेवांमध्ये कोणतीही अडचण उद्भवू नये व सदरचे हस्तांतर सुलभरित्या व्हावे म्हणून या दोन्ही विभागांमध्ये हा सामंजस्य करार ऑगस्ट 2022 मध्ये संचालक वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुंबई आणि संचालक आरोग्य सेवा संचालनालय,मुंबई यांच्यामध्ये सामंजस्य करार मसुदा तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक,परभणी व तत्कालीन अधिष्ठाता नियोजित वैद्यकीय महाविद्यालय यांच्या संयुक्त स्वाक्षरीने पाठविण्यात आला होता.

ऑगस्ट 2022 ते जून 2023 असा सात महिन्यापेक्षा अधिक कालावधी लोटला असताना तो करार आज पूर्णत्वास गेला आहे.

परभणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मान्यतेचे दरम्यानच्या काळात आयुर्विज्ञान आयोगाची मान्यता मिळण्यास अडचणी निर्माण झाल्या आणि पुनश्च परभणीकरांना संघर्षाचा मार्ग पत्करात रस्त्यावर आंदोलने करावी लागत आहेत.

सामंजस्य कराराच्या निहित वेळेत पूर्ण न होण्याच्या अवस्थेत आयुर्विज्ञान आयोगाने मान्यता रद्द करण्याची कार्यवाही केली आणि मोठा पेचप्रसंग निर्माण झाल्यावर तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक यांनी जिल्हाधिकारी परभणी यांना पत्र देऊन त्या करारा बाबत अद्याप पर्यंत काय कारवाई झाली आहे हे या कार्यालयास ज्ञात नाही त्यामुळे रुग्णालयाचे कामकाज व वैद्यकीय महाविद्यालयाचे उभारणीचे मानांकन पूर्ण करणे जिकरीची झाले आहे असे कळवले होते.

सामंजस्य करारात काय आहे ?

राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाची मान्यता प्राप्त करण्याचा दृष्टीने जिल्हा शल्य चिकित्सक पूर्ण सहकार्य करतील.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक हे रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक म्हणून कामकाज पाहतील.जिल्हा रुग्णालयातील सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत वैद्यकीय अधिकारी,आपत्कालीन वैद्यकीय अधिकारी, निवासीय वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत राहतील.आरोग्य सेवेतील इतर तज्ञ वैद्यकीय अधिकारी तसेच कर्मचारी वर्ग हे रुग्णालय हस्तांतरित झाल्यापासून फक्त एका वर्षासाठी वैद्यकीय महाविद्यालयात कार्यरत राहतील. त्यानंतर वैद्यकीय शिक्षण विभाग वरील सर्व पदांसाठी पद निर्मिती करेल.

सदर वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी अधिष्ठाता आणि रुग्णालयीन अधीक्षक,वैद्यकीय अधीक्षक यांच्या नियंत्रणाखाली कार्य करतील कोणत्याही परिस्थितीत अधिकारी,कर्मचारी प्रतिनियुक्तीने,समावेशनाने इतर कोणत्याही पद्धतीने वैद्यकीय शिक्षण व औषधे द्रव्य विभागाकडे हस्तांतरित करण्यात येणार नाहीत.जर वैद्यकीय शिक्षण विभागास आपत्कालीन वैद्यकीय अधीक्षक (CMO)आवश्यक असतील तर तसा प्रस्ताव त्यांनी सार्वजनिक आरोग्य आरोग्य विभागाकडे देऊन मंजुरी घ्यावी असे या करारात नमूद करण्यात आले आहे.

सामंजस करार निहित वेळेत पूर्ण होण्याच्या मागे असलेल्या अनेक कारणांपैकी रुग्णालयातील उपलब्ध यंत्रसामुग्री व जड वस्तुसंग्रह आहे त्या स्थितीत वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यांना वर्ग करण्याची तरतूद आहे त्या पुढच्या काळात त्यावरील दुरुस्ती व देखभालीचा खर्च संबंधित वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यांनी त्यांचे निधीतून भागवावा या संदर्भात सार्वजनिक आरोग्य विभागाकडे निधीची मागणी करता येणार नाही तसेच वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात जी यंत्रसामुग्री व जड वस्तू संग्रह वर्ग करण्यात आला आहे तो सामंजस्य करार संपुष्टात आल्यानंतर सुस्थितीत सार्वजनिक आरोग्य विभागास परत करण्यात यावा,असे नमूद आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय परभणी करिता अधिष्ठाता हे नियंत्रक व प्रशासकीय प्रमुख म्हणून रुग्णालय हस्तांतरणाच्या दिनांक पासून काम पाहतील.

जिल्हा सामान्य रुग्णालय,स्त्री रुग्णालय, अस्थिव्यंग रुग्णालय परिसरातील सर्व जागा रुग्णालयीन जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याच नावावर राहील.रुग्णालयीन इमारतीचा वापर वैद्यकीय शिक्षण विभाग करेल तथापि क्षयरोग,कुष्ठरोग कार्यालय जिल्हा शल्या चिकित्सक औषध भांडार पूर्वीप्रमाणेच जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या नावे राहील. जिल्हा अंधत्व निवारण सोसायटीसाठी उपलब्ध असलेल्या शस्त्रक्रियांपैकी एक शस्त्रक्रियाग्रह (OT)मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी उपलब्ध करून द्यावे अशी मागणी ही सामंजस्य करारात करण्यात आलेली आहे.

नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय कार्यान्वित करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाने वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी स्वतंत्र लेखाशीर्ष व निधी उपलब्ध करून द्यावा यासह 32 मुद्दे या करारात नमूद करण्यात आली आहेत.

सचिन देशपांडे : 7038566738

श्रमिक विश्व रिपोर्ट

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here