परभणी: ( २१ जुलै ) परभणी जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांनी आणि नर्सिंग स्टाफने अथक प्रयत्नांनी सर्पदंश झालेल्या एका महिलेचे प्राण वाचवले आहेत. सीमा विलास शेळके रा.पोटा (खु )औंढा येथील या महिलेला दि.१९ जून रोजी विषारी सापाने दंश केला होता आणि तिला तातडीने परभणीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्याल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
रुग्णालयात दाखल झाल्यावर डॉक्टरांनी महिलेची त्वरित तपासणी केली आणि तिला तीव्र विषबाधा झाल्याचे निदान केले.तातडीने औषध उपचार देण्यात आले.
वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता,जिल्हा शक्य चिकित्सक तथा अतिरीक्त जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या मार्गदर्शनाखाली अतिदक्षता विभागात पुढील उपचार्थ दाखल करण्यात आले. पुढील ३० दिवसांसाठी डॉक्टरांनी आणि विभागातील स्टाफने महिलेची काळजी घेतली आणि तिच्यावर सतत देखरेख ठेवली.
महिलेची स्थिती गंभीर होती आणि तिला अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागले. मात्र, डॉक्टरांनी आणि पॅरामेडिकल स्टाफने हार न मानता महिलेवर उपचार सुरू ठेवले.त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे महिलेची प्रकृती सुधारण्यास सुरुवात झाली आणि हळूहळू ती तंदुरुस्त होऊ लागली आहे.
परभणीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गंभीर रुग्णांच्या उपाचार्थ नजीकच्या काळात झपाट्याने सुधारणा झाल्याचे पाहायला मिळते आहे.मोठी बाह्य रूग्ण संख्या असलेल्या या रुग्णालयात औषध पुरवठा व वैद्यकीय संसाधनांच्या गुणवत्तेवर देखील विशेष लक्ष केंद्रित केले गेल्याने आर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्गातून येणाऱ्या रुग्णाच्या नातेवाईकांकडून समाधान व्यक्त केले जाते आहे.
३० दिवसांच्या उपचारानंतर महिला पूर्णपणे बरी झाली कृतज्ञपोटी सदर महिलेच्या कुटुंबियांच्या वतीने डॉक्टर,नर्सिंग स्टाफचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला,महिलेला रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले आहे.महिलेने आणि तिच्या कुटुंबाने डॉक्टरांचे आणि पॅरामेडिकल स्टाफचे आभार मानले,प्रसंगी अतिरीक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सारिका बडे, डॉ.संज्योत गिरी, डॉ.दत्ता खरवडे, डॉ.ज्ञानेश्वर गायकवाड, डॉ.शरद अवचार आणि अतिदक्षता विभागाचा कर्मचारी उपस्थित होत्या.या घटनेने डॉक्टरांच्या आणि पॅरामेडिकल स्टाफच्या समर्पण आणि कौशल्याचे कौतुक होत आहे.
श्रमिक विश्व