परभणी : (दि.२१) ‘अन्न दिन व अन्न सप्ताह’ कालावधीत रेशन दुकानदारांनी सकाळी आठ ते रात्री आठ पर्यंत धान्य दुकान उघडे ठेवणे बंधनकारक राहील अश्या प्रकारचे शासन आदेश अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या वतीने फेब्रुवारी २०१२ साली निर्गमित केले होते.
अन्न दिनाच्या अनुषंगाने प्रत्येक महिन्याच्या दिनांक ०७ हा दिवस अन्न दिन ( Food Day ) म्हणून मानण्यात यावा सदर दिवस हा सुट्टीचा दिवस असेल तरी ही,या दिवशी गावातील चावडी,रास्त भाव दुकान,सार्वजनिक ठिकाणी उपस्थित असलेले दक्षता समिती व इतर स्थानिक लोकांच्या उपस्थितीत जाहीर पद्धतीने शिधापत्रिकाधारकांना विहित पद्धतीनुसार धान्याचे वितरण करण्यात यावे अन्न सप्ताह दिनाच्या दिवशी वरील पद्धतीने धान्य वाटप केल्यानंतर शिल्लक उर्वरित लाभार्थ्यांना रास्त भाव दुकानातून दिनांक 8 ते 15 या लगतच्या सप्ताहात विक्री करिता उपलब्ध करण्यात यावे.अन्न सप्ताह ( Food Week ) म्हणून अमलात आणावा.शासन निर्णयात अश्या प्रकारचे निर्देश देण्यात आलेले असताना परभणी शहरात बहूसंख्य ठिकाणी रास्त भाव दुकान उघडण्याच्या वेळा निश्चीत नसल्याचे समोर आले आहे,त्यामुळे रेशन धान्य उच्चल करण्यासाठी येणाऱ्या कष्टकरी वर्गातील नागरिकांची तारांबळ उडते आहे.
शिधापत्रिका धारकांना महिन्यात किमान आठ दिवस रास्त भाव दुकानातून हमखास धान्य मिळण्याची व्यवस्था करावी अश्या स्पष्ट सूचना केल्या गेल्यात.शिवाय वरील बाबीचे अनुपालन होत आहे किंवा कसे याबाबत अधिनस्त कर्मचाऱ्यांच्या मार्फत तपासणी करावी अन्न दिन वा अन्न सप्ताह कालावधीत दुकानदारांनी सकाळी आठ ते रात्री आठ पर्यंत धान्य दुकान उघडे ठेवणे ही बंधनकारक करण्यात आलेले आहे.
सार्वजनिक वितरण व्यवस्थेत माहिती व दूरसंचार तंत्रज्ञानाचा वापर ( SMS GATEWAY )अनुषंगाने समूह लघु संदेश ( GROUP SMS ) पाठविण्याबाबत कारवाई करण्याच्या सूचना आहेत.शासकीय गोदामातून रास्त भाव दुकानाकडे धान्य रवाना केल्यानंतर लगेचच त्या दुकानाच्या परिसरातील लोकांना लघु संदेशांद्वारे धान्याच्या आकडेवारीची व वाहनांची माहिती शासकिय गोदामाकडून,तालुका कार्यालयाकडून देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने तहसील कार्यालय पुरवठा विभागाला देण्यात आल्यात,याचा सोईस्कर विसर विभागाला पडला असल्याचे निदर्शनास येते आहे.
स्वस्त धान्य शिधावाटप दुकानात पोहोचण्यापूर्वी त्याची माहिती गावातील शिधावाटप दुकान क्षेत्रातील कार्डधारकांना प्राप्त होईल व रवाना करण्यात आलेली धान्य पूर्णपणे आले किंवा नाही याची खात्री दुकानात जाऊन कार्ड धारक करू शकतील. रास्त भाव शिधावाटप दुकानदाराने किती धन्य आणले याची माहिती त्याच दिवशी जलद गतीने शिधापत्रिका धारकात समजेल तहसीलदार यांनी आपले स्तरावर नियोजन करून तालुक्यामध्ये संपूर्ण साखळी व्यवस्थापन यंत्रणेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी अन्नसुरक्षा अधिनियम २०१३ नुसार अन्न दिन व अन्न सप्ताह साजरा करणे तसेच समूह संदेश यंत्रणा कार्यान्वित करण्याकरिता कालबद्ध कार्यक्रम तयार करण्याच्या व विहित वेळेत धान्य शिधापत्रिका धारकांना पोहोच होईल यासाठी ठोस उपाययोजना करण्याचे निर्देश आहेत.