बँकिंगला अर्थव्यवस्थेचा कणा समजले जाते.या अर्थाने अर्थव्यवस्थेत बँकिंगला एक अनन्यसाधारण महत्त्व आहे. महाराष्ट्र त्यामानाने बँकिंगमध्ये खूपच प्रगत आहे.व्यापारी बँकांच्या देशभरातून शाखा 1,53,102 तर महाराष्ट्रात 16,827 म्हणजे 11% तर व्यवसाय आहे 240.35 कोटी रुपये. ज्या तुलनेत महाराष्ट्रातील बँकिंगचा व्यवसाय आहे 47.70 कोटी रुपये म्हणजे 20%. त्याचे प्रतिबिंब आपण सकल घरेलू उत्पादन,राष्ट्रीय उत्पन्न या निकषात पडलेले पाहतो ज्यामुळे महाराष्ट्र आजही देशाच्या नकाशात आपला अव्वल नंबर टिकवून आहे पण महाराष्ट्र राज्य म्हणून दिसणारे हे चित्र राज्यांतर्गत काही विकासाची बेटे आहेत त्यामुळे दिसते.
महाराष्ट्र राज्यात व्यापारी बँकांच्या एकूण शाखा आहेत 13,096 तर सहकारी बँकांच्या 3,731 म्हणजे एकूण शाखा आहेत 16,827.व्यापारी बँकांचा व्यवसाय आहे 47.70 लाख कोटी रुपये तर सहकारी बँकांच्या व्यवसाय आहे 2.21 लाख कोटी रुपये. एकूण व्यवसाय आहे 49.91 लाख कोटी रुपये या तुलनेत मराठवाड्यातील आठ जिल्ह्यात एकूण शाखा आहेत 2,125 तर व्यवसाय आहे 1.61 लाख कोटी रुपये. एकूण शाखांच्या तुलनेत ग्रामीण भागातून शाखा राज्यात आहेत 35.61% तर मराठवाड्यात एकूण 49.83 % राज्यांच्या तुलनेत मराठवाड्यातून शाखा आहेत 12.62% तर ठेवी आहेत 3.44% तर कर्ज आहे 2.99% तर एकूण व्यवसाय 3.23% एवढा.ठेवीच्या तुलनेत कर्ज त्याला बँकिंग परिभाषेत क्रेडिट डिपॉझिट रेशो असे संबोधले जाते. तो महाराष्ट्र राज्याचा आहे 85.13% तर मराठवाड्याचा आहे 76.03% एवढा. मुंबई शहराचा क्रेडीट डिपॉझिट आहे 124.23%. याचा अर्थ मराठवाड्यासारख्या मागास भागातून गोळा केलेली बचत आर्थिक दृष्ट्या विकसित मुंबई महानगर कडे वळवली जाते.मराठवाड्यातील आठ जिल्ह्यातील बँकिंग व्यवसाय 1. 61% लाख कोटी रुपये तर एकट्या पुणे जिल्ह्यातील बँकिंगचा व्यवसाय आहे 5.48 लाख कोटी रुपये म्हणजे मराठवाड्याच्या तुलनेत तो 3.39 पटीने जास्त आहे.मुंबई ठाणे आणि पुणे तीन जिल्ह्यात बँकिंगचा एकूण व्यवसाय आहे 40.04 लाख कोटी रुपये म्हणजे महाराष्ट्रातील एकूण बँकिंग व्यवसायाचा तुलनेत 80.22% एवढा याचाच अर्थ उर्वरित 33 जिल्ह्यातील बँकेत बँकिंगचा व्यवसाय आहे अवघा 19.8% एवढा.
मराठवाड्यातील आठ जिल्ह्याच्या तुलनेत पश्चिम महाराष्ट्रातील सहा जिल्हे नगर,कोल्हापूर,नाशिक,सातारा,सांगली,सोलापूर येथील बँकिंगचा व्यवसाय आहे 3.25 लाख कोटी रुपये म्हणजे मराठवाड्याच्या तुलनेत बरोबर दुप्पट.मराठवाड्याच्या तुलनेत विदर्भातील 11 जिल्ह्यातून बँकिंगचा व्यवसाय आहे 3.10 लाख कोटी रुपये एवढा म्हणजे जवळजवळ 90% नी जास्त पण पुन्हा त्यातून एकट्या नागपूर जिल्ह्याचा व्यवसाय आहे 1.74 लाख कोटी रुपये म्हणजे जवळजवळ मराठवाड्यातील एकूण व्यवसायाच्या बरोबरीने 1.61 लाख कोटी रुपये.
महाराष्ट्र राज्य अंतर्गत मराठवाडा आणि विदर्भ मागास आहेत.त्याचे प्रतिबिंब आपल्याला फार स्पष्टपणे बँकिंगमध्ये बघायला मिळते मराठवाड्यातील आठ जिल्ह्यातून एकूण कर्ज वाटप आहे 68,700 कोटी रुपये यातील 90% प्राधान्यक्रम क्षेत्राला म्हणजे शेती,पूरक उद्योग,सरकार पुरस्कृत योजना, छोटे उद्योग यांना वाटण्यात आले आहे.उद्योगाला वाटण्यात आलेली कर्ज खूपच कमी आहेत.जिल्हा सहकारी बँकेचे मराठवाड्यातील जाळे फार कमकुवत पायावर उभे आहे. एखादा दुसरा अपवाद सोडला तर बाकी सगळ्या जिल्हा सहकारी बँका आजारी आहेत,प्रादेशिक ग्रामीण बँकांचे जाळे प्रभावी आहे पण त्यांच्या वाढीला काही एक मर्यादा आहेत. तर व्यापारी बँकांतून सम्मिलिकरना नंतर शाखांचे जाळे आकुंचित झाले आहे. एकूणच मराठवाड्यातले बँकिंग आज अडखळत चालले आहे आणि हे असेच चालले तर ओघाने त्याचे पडसाद अर्थव्यवस्थेत देखील उमटतील हे लक्षात घेता मराठवाड्याच्या विकासाचा विषयी तळमळ असलेल्या सगळ्यांनी या प्रश्नाकडे अधिक गांभीर्याने बघण्याची आवश्यकता आहे. बँकिंग विषय केंद्राच्या अखत्यारीत येतो तसे राज्यस्तरीय बँकिंग समिती हे व्यासपीठ आहे,जेथे या प्रश्नावर चर्चा करून कार्यगट स्थापन केला गेला तर जरुर एखादा कृती आराखडा तयार करून जानते प्रयत्न केले गेले तर मराठवाड्यातील बँकिंगच नव्हे तर आर्थिक विकासाला देखील चालना मिळू शकेल.मराठवाड्याचा मागासलेपणा कमी होईल.
देवीदास तुळजापूरकर.
drtuljapurkar@yahoo.com