जागरूक नागरिक आघाडीची निदर्शने
परभणी शहर महानगरपालिकेतील नागरिकांच्या न्याय मागण्याबाबत तात्काळ कार्यवाही करण्यासाठी
महापौर व उपमहापौर यांना निवेदन देऊन आज मंगळवारी (दि.17) सकाळी जागरूक नागरिक आघाडीच्या वतीने निदर्शने करण्यात आली. यावेळी ऍड.माधुरी क्षीरसागर, सुभाष बाकळे, राजन क्षीरसागर आदी आंदोलनात सहभागी झाले. महापौर अनिता सोनकांबळे यांनी आंदोलन स्थळी महात्मा फुले यांच्या पुतळ्याजवळ येऊन निवेदन स्वीकारले व मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. यावेळी रवी सोनकांबळे हेदेखील उपस्थित होते.
याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, परभणी महानगरपालिका झाल्यानंतरही परभणी शहराची अवस्था अत्यंत वाईट आहे. एका बाजुला खड्य्यातील रस्ते , 12-15 दिवसांतून एकदा पाणी , तुडूंब भरलेल्या नाल्या तर दुसऱ्या बाजुला प्रचंड वाढलेली घरपट्टी , नळपट्टी यामुळे सर्व सामान्य जनता मेटीकुटीला आलेली आहे. रस्त्यावरील वाढती अतिक्रमणे, बंद पडलेली सिग्नल व्यवस्था, विस्कळीत वाहतुक हे सर्व प्रश्न नेहमीचेच झाले आहेत. या सर्व प्रश्नाबद्दल जागरुक नागरिक आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे व आता तात्काळ काही मागण्या आघाडीच्या वतीने करण्यात आल्या आहेत.
महात्मा फूले पुतळ्याजवळील चौकाचे सुशोभीकरण करावे व तेथे हायमास्ट लाईट तात्काळ बसवावे. या चौकात जिल्हा परिषद , प्रशासकिय बिल्डींग यामुळे वाहनाची प्रचंड गर्दी होत आहे त्यामुळे तेथे सिग्नलची व्यवस्था करावी. शिवाजी पुतळ्याजवळील एकमेव सिग्नल व्यवस्था तात्काळ चालु करावी. भारत नगर विसावा कॉर्नर ते दत्तधाम पर्यंत तसेच जाळीचा महादेव ते गंगाखेड रोड या मार्गावर इलेक्ट्रीक बस सेवा तात्काळ सुरु करावी. अंत्यसंस्कारासाठी गॅस वाहिनीचा प्रस्ताव शासनाने मंजुर केला आहे त्याची अंमलबजावणी करावी. ज्या एजन्सीला महानगरपालिकेने कंत्राट दिले आहे त्यांना सर्व स्ट्रीट लाईट तात्काळ सुरु करण्याचे आदेशीत करावे . बालविद्या शाळेजवळील नाना – नानी पार्क उद्यानाच्या विकासासाठी 5 कोटींचा निधी 5 वर्षापूर्वी मंजूर झाला होता, गेल्या 4 वर्षापासून प्रशासनाने ज्या कंत्राटदाराला काम दिले त्याने ते पूर्ण केले नाही. विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी या कंत्राटदाराच्या कामाचे चौकशी करण्याचे आदेश देऊनही म.न.पा. प्रशासन त्याला पाठीशी घालत आहे ही गंभीर बाब आहे. तरी संबंधीत कंत्राटदार वा अधिकारी यांच्यावर तात्काळ कार्यवाही करण्यात यावी. तरी वरील मागण्याबाबत तात्काळ कार्यवाही करावी अन्यथा तिव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा जागरुक नागरिक आघाडी जिल्हा परभणी समन्वयक ऍड.माधुरी क्षीरसागर , सुभाष बाकळे, कॉ.राजन क्षीरसागर, संतोष आसेगावकर, ऍड.लक्ष्मण काळे, प्रभावती अन्नपुरे, सुरेश कदम, अनिल भवरे, गणपत गायकवाड,अर्जुन खुणे, विजय तम्मेवार, गजानन चौधरी, बाळासाहेब पतंगे, सुनिल ससाणे, कृष्णा कानडे, कृष्णा काळे, समीर शेख, सागर मुंडे आदीनी दिला आहे.
श्रमिक विश्व न्यूज